जाणून घ्या सुधारित मोटार वाहन अधिनियमाविषयी


भारतामध्ये दर चार मिनिटांमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू वाहन अपघातामध्ये होत असतो. अपघाताने मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये दरदिवशी सोळा, या प्रमाणे लहान मुलांचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे मद्यपानाच्या धुंदीमध्ये गाडी चालविल्याने होणाऱ्या अपघातांची संख्याही भारतामध्ये मोठी आहे. एका वृत्तवाहिनीने २०१३ साली केलेल्या सर्वेक्षणामध्ये त्या वर्षी १,३७,००० व्यक्ती वाहन अपघातांमध्ये मृत्युमुखी पडल्या असल्याचे म्हटले आहे. ही संख्या दरवर्षी वाढतच आहे. अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता केंद्रीय मंत्रीमंडळाने वाहन अधिनियमामध्ये बदल करणारे बिल नुकतेच पारित केले असून, त्यामध्ये वाहनविषयक कायद्यांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. या पूर्वी हे बिल राज्यसभेमध्ये मंजुरी साठी आले असून ते पारित केले जाण्यापूर्वीच निवडणुका जाहीर झाल्या होत्या. पण आता केंद्रीय मंडळाने याबाबत दिरंगाई न करता नवे अधिनियम पारित केले आहेत. हे नवे नियम अठरा हून अधिक राज्यांच्या परिवहन मंत्रालयांकडून आलेल्या सूचना ध्यानी घेऊन तयार करण्यात आले असून, या नव्या नियमांना संसेदेच्या स्टँडिंग कमिटीने मंजुरी दिली आहे.

या नव्या अधिनियमानुसार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना जबर दंड करण्याचे प्रावधान देण्यात आले असून, आपातकालीन वाहनांना (रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या, इ,) यांना जाण्यास वाट न देता रस्ता अडवून ठेवणाऱ्या वाहनचालकांना दहा हजार रुपयांपर्यंत दंड केला जाण्याचे प्रावधान केले गेले आहे. तसेच वाहन चालविण्यासाठी अधिकृत परवाना असल्याशिवाय वाहन चालविताना आढळल्यासही दहा हजार रुपयांचा दंड ठोठविण्यात येणार आहे. वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसवून सिग्नल मोडणाऱ्यांना शंभर रुपयांच्या ऐवजी आता पाचशे रुपये दंड भरावा लागणार आहे, तर वाहतूक पोलिसांच्या कारवाईला अडथळा आणणाऱ्यांनाही दोन हजार रुपये दंड केला जाऊ शकण्याचे प्रावधान नव्या अधिनियमामध्ये केलेले आहे.

लायसन्स जवळ न बाळगता गाडी चालविताना आढळल्यास पाच हजार रुपये, तर वेगमर्यादा ओलांडून सुसाट गाडी चालविणाऱ्या मंडळींना एक ते दोन हजार रुपये दंड केला जाणार आहे. गाडीचा विमा उतरविला नसल्यास किंवा विमा ‘रीन्यू’ न केला गेल्याचे आढळल्यास दोन हजार रुपये दंड केला जाणार आहे. हेल्मेटचा वापर न करता दुचाकी चालविल्यास हजार रुपये, तर अठरा वर्षांच्या आतील मुलांच्या हातामध्ये वाहन दिल्यास पालकांना पंचवीस हजार रुपये दंड आणि तीन महिने कारावासाची शिक्षा व वाहनाची नोंदणी कायमस्वरूपी रद्द करण्याचे प्रावधान नव्या अधिनियमामध्ये करण्यात आले आहे. तसेच एखाद्या वाहनामध्ये वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त व्यक्ती प्रवास करताना आढळल्यास एक लाख रुपयांपर्यंत दंड केला जाणार आहे.

मद्यपान करून वाहन चालविताना आढळल्यास दहा हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहे, तर रस्त्याने भरधाव वाहन चालविताना आढळल्यास पाच हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. तसेच खुद्द वाहतूक पोलिसांनी यापैकी कुठल्याही नियमांचा भंग केल्याचे आढळल्यास त्यांना दुप्पट दंड भरावा लागणार आहे. रस्त्यामध्ये एखाद्यावेळी कोणाला अपघात झाला, तर अपघातग्रस्त लोकांना मदतीचा हात देण्यास पुढे न येता आसपासचे लोक केवळ बघ्याची भूमिका घेत असतात. अपघातग्रस्तांना मदत केली तर औपचारिक कारवाईची कटकट नको, म्हणून बहुतेक मंडळी इच्छा असूनही मदतीचा हात पुढे करण्यास कचरतात. ही बाब लक्षात घेता कर्नाटक सरकारच्या वतीने अपघात ग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तींना इतर औपचारिक कारवाईचा कोणताही त्रास होऊ नये यासाठी देखील नवे नियम ‘गुड समारीतान बिल’च्या अंतर्गत अस्तित्वात आणण्यात आले आहेत. हे बिल कर्नाटक राज्य सरकारने अंमलात आणले असून, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या बिलला मंजुरी दिली आहे.

Leave a Comment