या आहेत भारतातील सर्वात वयस्क ‘शार्पशूटर’ आजीबाई


एखादे ध्येय साध्य करण्याची इच्छा मनामध्ये दृढ असली, की ती इच्छा पूर्ण करण्यासाठी वयाची अट लागत नाही हे विधान ‘शूटर दादी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, जगातील सर्वात वयस्क शार्पशूटर्स असणाऱ्या या आजीबाईंनी सत्यात उतरविले आहे. वृद्धत्वाचा अडसर पार करीत या आजीबाईंनी निष्णात शूटर म्हणून स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे. या आजीबाई ‘शूटर दादी’ म्हणून लौकिक मिळवत आहेत. वयाच्या ८७व्या वर्षी देखील चन्द्रो तोमर या आजीबाईंचा उत्साह, आणि ताकद विशीतल्या तरुणांनीही लाजवेल अशी आहे. इतकेच नव्हे, तर बंदुकीने अचूक निशाणा साधण्याच्या त्यांच्या कसबामध्ये त्यांना मात देणारे अभावानेच आढळतात. चन्द्रो तोमर यांना ‘शूटर दादी’ किंवा ‘रिव्हॉल्व्हर दादी’ या नावाने ओळखले जात असून, उत्तरप्रदेशातील बागपत जिल्ह्यातील जोहरी गावाच्या त्या निवासी आहेत. आजवर तीसहून अधिक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये चन्द्रो यांनी पुरस्कार मिळविले असून, जगातील सर्वात वयस्क शार्प शूटर असण्याचा विक्रम त्यांच्या नावे नोंदलेला आहे.

चन्द्रो शार्प शूटर बनल्या, त्याही अगदी योगायोगानेच. १९९९ साली चन्द्रो आपल्या नातीच्या सोबत जोहरी रायफल क्लबमध्ये गेल्या असता तिथे त्यांच्या नातीला रायफलमध्ये गोळ्या लोड करणे जमेना. त्यावेळी चन्द्रो यांनी आपल्या नातीच्या हातून रायफल घेतली, ती लोड केली आणि आयुष्यामध्ये प्रथमच रायफल ‘फायर’ही केली. चन्द्रोंच्या रायफलमधूल बाहेर पडलेल्या पहिल्याच गोळीने अचूक ‘बुल्स आय’ भेदला. त्यानंतर चन्द्रो यांनी अनेक राऊंड ‘फायर’ केले असता, त्यांची निशाणेबाजी पाहून तिथे उपस्थित असलेल्या सर्वच लोकांनी आणि प्रशिक्षकांनी देखील आश्चर्याने तोंडात बोटे घातली. चन्द्रो यांची बंदुकीची पकड, आणि निशाण्यावरची एकाग्र नजर हे त्यांचे गुण क्लबच्या प्रशिक्षकांच्या लक्षात आल्याने त्यांनी चन्द्रो यांना क्लबच्या सभासद होण्याचा आग्रह केला.

प्रशिक्षकांचा आग्रह मान्य करीत चन्द्रो यांनी रायफल क्लबचे सभासदत्व घेतले आणि त्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली. दोन वर्षे सातत्याने प्रशिक्षण घेतल्यानंतर चन्द्रो यांनी पहिल्या वहिल्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. या स्पर्धेमध्ये चन्द्रो तोमर यांनी दिल्लीच्या पोलीस उपप्रमुखांना पराजित केले ! या ऐतिहासिक स्पर्धेनंतर चन्द्रो यांनी अनेक स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळविले. त्यांच्या या यशाबद्दल अनेक संस्थांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते चन्द्रो तोमर यांचा गौरव करण्यात आला. त्यांना पूर्वराष्ट्रपती श्री प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते स्त्री शक्ती पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. तसेच महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या वतीने देखील चन्द्रो यांना ‘आयकॉन लेडी’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

२०१० साली चन्द्रो यांच्या कन्या सीमा रायफल अँड पिस्टल वर्ल्ड कप मध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. चन्द्रो यांच्या जाऊबाई प्रकाशी तोमर यांनी ही चन्द्रो यांच्या पावलावर पाऊल ठेवत निशाणेबाजीचे कौशल्य आत्मसात केले आहे. प्रकाशी यांचे वय ८२ वर्षांचे असून, त्याही चन्द्रो यांच्याप्रमाणे त्याही उत्तम निशाणेबाज आहेत. प्रकाशी यांच्याकडे बाराशे डॉलर्स किंमतीचे पिस्तुल असून, आपल्या पारंपारिक पोषाखामध्ये प्रकाशी आणि चन्द्रो निशाणेबाजीचा सराव करीत असतात. चन्द्रो आणि प्रकाशी या दोन्ही आजीबाईंनी आजवर अनेक स्पर्धांमध्ये पंचवीसहूनही अधिक पदके मिळाली असून त्याच्या यशाने निशाणेबाजीचे कौशल्य आत्मसात करण्याची प्रेरणा अनेकांना मिळाली आहे.

Leave a Comment