रद्द होणार मेहुल चोक्सीचे अॅन्टिग्वाचे नागरिकत्व


नवी दिल्ली – पीएनबी घोटाळ्यातील आरोपी असलेल्या मेहुल चोक्सीला देश वापसीचा मार्ग मोकळा झाला आहे. अॅन्टिग्वाचे नागरिकत्व मेहुल चोक्सीने घेतले आहे. पण अॅन्टिग्वाचे पंतप्रधान गॅस्टन ब्रॉउन यांनी भारताने दबाव टाकल्यानंतर मेहुल चोक्सीचे नागरिकत्व रद्द करणार असल्याचे सांगितले आहे.

अॅन्टिग्वाचे पंतप्रधान गॅस्टन ब्रॉउन म्हणाले, आम्ही दुसऱ्या देशातून पळून आलेल्या व्यक्तीला नागरिकत्व देऊ शकत नसल्यामुळे चोक्सीचे नागरिकत्व रद्द करुन त्याला भारतात माघारी पाठवले जाईल. पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेल्या नीरव मोदीचा फरार उद्योगपती मेहुल चोक्सी हा मामा आहे. या प्रकरणात तोही प्रमुख आरोपी आहे. सध्या हे दोघेही तपास यंत्रणांना चकवा देत परदेशात रहात आहेत.

गेल्या वर्षी उघडकीस आलेल्या या घोटाळ्यात १३ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला होता. बँकेला फसवून कर्ज न फेडताच या दोघांनी देशातून पळ काढला आहे. या घोटाळ्यात बँकेच्या काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे. चोक्सीने काही दिवसांपूर्वीच मी भारतातून पळालो नाही. उपचारांसाठी परदेशात गेलो असल्याचे न्यायालयाला कळवले होते. यानंतर कॅरेबिअन देश अँटिग्वा येथून चोक्सीला भारतात आणण्यासाठी एअर अँब्युलन्स पाठवण्यासही तयार आहोत, यामध्ये वैद्यकीय तज्ज्ञ मंडळी असतील. त्याचबरोबर चोक्सीला भारतात सर्व प्रकारच्या आवश्यक वैद्यकीय सुविधा देखील पुरवण्यात येतील, असा युक्तिवाद ईडीने न्यायालयात केला आहे.

तपासामध्ये मेहुल चोक्सीने कधीही सहकार्य केलेले नाही. अजामीनपात्र वॉरंट त्याच्याविरोधात काढण्यात आले आहे. त्याच्याविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीसही काढली आहे. पण, तरीही परत येण्यास तो तयार नसल्यामुळेच त्याला फरार घोषित करण्यात आले आहे.

Leave a Comment