अमेरिका म्हातारी होतेय!


चालू शतकात भारत हा सर्वाधिक तरुण असलेला देश आहे. आज जगात तरुणांची संख्या सर्वाधिक असलेला देश भारत हा आहे. या देशातील 65 टक्के लोकसंख्या 35 वर्षांपेक्षाही कमी आहे. एकीकडे भारतात तरुणांची संख्या वाढत असतानाच जगातील अन्य देशांमध्ये मात्र ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे त्या देशांना काळजी लागली आहे. या देशांमध्ये पहिला क्रमांक जपानचा, दुसरा चीनचा आणि तिसरा क्रमांक अमेरिकेचा आहे.

अमेरिकेचे नागरिक झपाट्याने वृद्ध होत आहेत आणि कुटुंबांचा आकार कमी होत आहे. त्याचा थेट परिणाम कामगारांच्या बाजारावर होत असून कुशल कामगार मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे नजिकच्या भविष्यात काम करणारी माणसे मिळणे अवघड होईल, असा तज्ञांचा अंदाज आहे.
सन 2030 पर्यंत अमेरिकेतील 20 टक्के नागरिक 66 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे असतील. सन 2010 मध्ये हेच प्रमाण 13 टक्के होते आणि 1970 मध्ये ते फक्त 10 टक्के होते.

अधिक लोक वयस्कर होणे हे आर्थिक वाढीवर प्रतिकूल परिणाम करते आणि कामावर असणारे जुने लोक हे तरुणांपेक्षा कमी उत्पादनक्षम असतात, असे विविध पाहण्यांवरून दिसून आले आहे. मात्र अमेरिकी नागरिक वृद्ध होत असल्यामुळे देशाच्या जन्मदरातही घट झाली असून तो 32 वर्षांतील सर्वात कमी पातळीवर आला आहे. अमेरिकेत 2018 मध्ये 38 लाखांपेक्षा कमी बाळ जन्माला आले. त्याआधीच्या वर्षापेक्षा ही संख्या दोन टक्क्यांनी कमी होती.

अमेरिकेला आपली लोकसंख्या वाढविण्याची इच्छा असेल तर वयोवृद्ध लोकांची ही संख्या काळजीचे कारण ठरेल, असे डेव्हिड केली या तज्ञाने व्हऑईस ऑफ अमेरिका या सरकारी संस्थेला सांगितले. डेव्हिड केली हे जे.पी. मॉर्गन अॅसेट मॅनेजमेंट या गुंतवणूक कंपनीचे तज्ञ आहेत.

“जर तुम्ही गृहनिर्माण उद्योग किंवा स्वयंचलित वाहन उद्योगासारख्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करीत असाल आणि तुम्हाला सतत वाढत्या लोकसंख्येची गरज असेल तर अमेरिकेची लोकसंख्या मंदगतीने होईल, अशा जगाची आपल्याला गरज आहे,” असे ते म्हणतात.

मात्र अर्थशास्त्राच्या पलीकडे पाहिल्यास, जगाची लोकसंख्या वाढणे हे पृथ्वीच्या पर्यावरणाला अधिक नुकसान करू शकते. त्यामुळे लोकसंख्येचा वेग वाढविण्याऐवजी अमेरिकी धोरण निर्मात्यांनी लहान कामगार वर्गाला लक्षात घेऊनच आपली धोरणे आखावीत, असा त्यांचा सल्ला आहे. “आम्ही खरोखरच लोकसंख्येच्या मंद वाढीशी जुळवून घेतले पाहिजे कारण हे स्पष्टपणे घडत आहे,” असा त्यांचा सल्ला आहे. भविष्यात अमेरिकेची आर्थिक वृद्धी कमी होण्यासाठी लोकांनी तयार राहावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

अर्थात मानवी कामगारांची अशा प्रकारे टंचाई निर्माण झाली तर रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना मिळेल, असे केली यांचे भाकीत आहे. तसेच मनुष्यबळाची ही कमतरता भरून काढण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे कायदेशीर स्थलांतरितांना अधिक प्रवेश देणे. हे स्थलांतरित साधारणपणे कामाच्या वयात म्हणजे तरुण असताना अमेरिकेत येतात. मात्र अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे स्थलांतरितांच्या विरोधात आहेत आणि स्थलांतरितांना देशात येऊ द्यावे की नाही, यावरून अमेरिकी संसद आणि त्यांच्यात कायम खटके उडत असतात. त्यामुळे बहुसंख्य वृद्धांच्या संख्येशी जुळवून घेणे, हाच पर्याय आज अमेरिकी प्रशासनासमोर आहे.

आज अमेरिका आणि चीनसारखे देश जात्यात आहेत, तर भारत सुपात आहे. तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत आणि अन्य विकसनशील देशांमध्ये या शतकाअखेर वृद्धांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढणार आहे. देशातील लोकसंख्येची एकूण रचना पाहता भविष्यात 2050 मध्ये वृद्धांची संख्या 34 करोड इतकी असणार आहे. शिवाय त्यावेळी जगाची लोकसंख्या 11.2 अब्जांवर गेलेली असेल, असे संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतासोबतच चीन आणि ब्राझीलसारख्या देशांना येत्या काही दशकांमध्ये वृद्धांच्या वाढत्या संख्येचा अंदाज घेऊन त्यांच्यासाठी भरीव तरतूद करावी लागणार आहे. त्यामुळे अमेरिकेच्या या समस्येचा धडा घेऊन भारताला त्या प्रमाणे उपाययोजना करावी लागणार आहे.

Leave a Comment