मराठी चित्रपटासाठी गाणार मिका सिंह


आपल्या भारदस्त आवाजामुळे बॉलिवूडमध्ये ओळखला जाणारा आणि असंख्य लोकप्रिय हिंदी गाण्यासाठी आवाज देणारा मिका सिंह लवकरच एका मराठी चित्रपटातील गाण्याला आवाज देणार आहे. या गाण्याचे शीर्षक येरे येरे पैसा असे असणार आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करत मिका सिंहने याबद्दलची माहिती दिली आहे.

या गाण्याच्या काही ओळी गात मी मराठी माणसाठी, जय महाराष्ट्र असे तो म्हणताना दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि हेमंत ढोमेदेखील व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत दिसत आहेत. गाणे रेकॉर्ड करण्यापूर्वी स्टूडिओमध्ये काढलेला हा व्हिडिओ आहे. संजय जाधवद्वारा दिग्दर्शित ‘येरे येरे पैसा’ या मराठी चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


मिका याच चित्रपटातील शीर्षक गीत ‘येरे येरे पैसा’ला आवाज देत आहे. याआधीही ‘डोक्याला शॉट’ या मराठी चित्रपटाच्या शीर्षक गीताला मिका सिंहने आवाज दिला आहे. यानंतर आता पुन्हा एकदा मराठी श्रोत्यांची मने जिंकण्यासाठी मिका सज्ज झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संजय जाधव ‘येरे येरे पैसा’ चित्रपटाच्या सिक्वलचे दिग्दर्शन करणार नसून या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे करणार आहे. तर या चित्रपटाची निर्मिती अमेय खोपकर यांच्या प्रोडक्शन हाऊसद्वारे केली जाणार आहे. चित्रपटात कोणत्या कलाकारांची वर्णी लागली आहे, याबद्दलची माहिती अद्याप गुलदस्त्यातच आहे.

Leave a Comment