देवेगौडांची भविष्यवाणी – सरकारची गच्छंती अटळ?


कर्नाटकातील धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आणि काँग्रेस पक्षाच्या युतीचे सरकार अत्यंत नाजूक परिस्थितीतून जात आहे. सरकारी प्रकृती तोळामासा असून आपली कोंडी होत असल्याबद्दल मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी वारंवार सांगत आहेत. त्यासाठी कॅमेऱ्यासमोर अश्रूही ढाळत आहेत.
माझी वेदना शब्दांत वर्णन करता येण्यासारखी नाही, असे गेल्या आठवड्यातच कुमारस्वामी यांनी म्हटले होते. भारतीय जनता पक्षाच्या घशात सत्तेचा घास जाऊ नये म्हणून दोन्ही पक्षांनी कसेबसे हे सरकार सावरून धरले आहे. मात्र जेडीएसचे अध्वर्यू आणि देशाचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी एक भविष्यवाणी करून या प्रयत्नांना मोठा धक्का दिला आहे. देवेगौडा हे सध्या 86 वर्षांचे आहेत आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता, हे येथे उल्लेखनीय.

बंगळुरु येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “कर्नाटकात मध्यावधी निवडणुका अवश्य होतील यात काही शंका नाही. काँग्रेसने आम्हाला पाच वर्षे पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले होते मात्र आता त्यांची वागणूक बदलली आहे. सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता हे सरकार पाच वर्षे चालेल की नाही, याची खात्री देता येत नाही. हे सरकार किती काळ टिकेल याची कोणालाही माहिती नाही. सर्वकाही काँग्रेसच्या हाती आहे. खरंतर, लोकसभा निकालांनंतर काँग्रेसने आपली काही शक्ती गमावली आहे परंतु आम्ही त्यांच्याबरोबर आहोत.”

“माझा मुलगा एच. डी. कुमारस्वामी याला मुख्यमंत्री करावे, अशी माझी इच्छा नव्हती. लोक सर्व काही बारकाईने पाहत आहेत. काँग्रेसला युती सरकार बनविण्यासाठी मी सांगितले नव्हते. त्यांनीच आपणहून येऊन सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता. मी माझे काम चालू ठेवीन. मी कोणालाही दोष देत नाही,” असे देवेगौडा यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि जेडीएस युतीत पराभवावरून कुरबुरी चालू असतानाच त्यांनी हे वक्तव्य केल्यामुळे चर्चांना ऊत आला. मात्र त्यानंतर थोड्याच वेळात देवेगौडा यांनी आपले हे वक्तव्य स्थानिक संस्थांच्या निवडणुकांबद्दल होते, विधानसभा निवडणुकीबद्दल नव्हते, असे स्पष्टीकरण दिले.

देवेगौडा यांच्या वक्तव्यावरील वाद शमतो न शमतो तोच ज्येष्ठ काँग्रेस नेते एम. वीरप्पा मोईली यांनी शनिवारी षटकारच ठोकला. जेडीएसशी युती केली नसती तर लोकसभा निवडणुकीत पक्षाने 15 ते 16 जागा जिंकल्या असत्या आणि युतीवर विश्वास ठेवणे ही एक चूक होती, असे मोईली म्हणाले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि जेडीएसने युती करून प्रत्येकी एक जागा जिंकली, तर भाजपने 25 जागा जिंकल्या होत्या. या युतीवर विश्वास ठेवणे ही एक चूक होती आणि आमच्या लोकांनी (काँग्रेस) देखील मला विरोध केला, असे ते म्हणाले. या पराभवासाठी त्यांनी राज्यातील सरकारला जबाबदार धरले असून सरकारच्या निष्क्रियतेमुळेही हे प्रतिकूल निकाल आल्याचा त्यांनी आरोप केला. सत्ताधाऱ्यांनी आपले सरकार वाचविण्याव्यतिरिक्त लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले पाहिजे, असे ते म्हणाले.

इतकेच नव्हे तर देवेगौडा यांच्या वक्तव्याच्या केवळ दोनच दिवस आधी काँग्रेस विधानमंडळ पक्षाचे नेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पक्षप्रमुख राहुल गांधी यांची भेट घेतली होती. जेडीएससोबतच्या युतीमुळे फायद्यापेक्षा तोटाच जास्त झाल्याचे आणि त्यामुळे या युतीचा पुनर्विचार करण्याचे त्यांनी राहुल गांधी यांना पटवून दिल्याचे सांगण्यात येते. सिद्धरामय्या यांच्या निष्ठावंत काँग्रेसच्या आमदारांनी कुमारस्वामी आणि त्यांच्या सरकारला वारंवार लक्ष्य केले आहे. त्याबद्दलही देवेगौडा यांनी यापूर्वी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. भाजपच्या बी. एस. येडियुरप्पा यांनीही सरकार उलथवण्याचे प्रयत्न थांबविले असून या सरकारला आपल्या हाताने मरण येऊ द्यावे, अशी भाजपची आता नीती आहे.

या सगळ्याचा मथितार्थ एकच, की कर्नाटकातील राजकीय नाट्य काही संपण्याचे नाव घेत नाही. सत्ताधारी युतीतील दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असून त्यात राज्याचा कारभार मात्र मार खात आहे. काही झाले तरी कर्नाटकात सरकारची गच्छंती अटळ आहे, हेच खरे आहे.

Leave a Comment