या जपानी बर्गरची किंमत चक्क एक हजार डॉलर्स !


एक हजार डॉलर्स ही रक्कम तशी लहान नाही. इतक्या पैश्यातून तुम्ही पुष्कळ शॉपिंग करू शकता, एखाद्या चांगल्याश्या रेस्टॉरंटमध्ये भोजन घेऊ शकता, किंवा हजार डॉलर्स किंमतीचा एक बर्गर खाऊ शकता. बर्गरसारख्या पदार्थासाठी एक हजार डॉलर्स एवढी रक्कम पुष्कळ मोठी असून, हा बर्गर जगातील काही सर्वात महागड्या खाद्यपदार्थांपैकी एक आहे. जपानमधील टोकियो शहरातील ग्रँड हयात हॉटेलच्या ‘द ओक डोअर स्टेक हाऊस’ या ठिकाणी हा बर्गर चाखण्याची संधी मिळते. या ठिकाणी हा बर्गर ‘द गोल्डन जायन्ट बर्गर’ या नावाने उपलब्ध आहे. हा बर्गर बनविण्याची कल्पना अमेरिकन शेफ पॅट्रिक शिमाडा यांची असून, जपानी चलनामध्ये या बर्गरची किंमत १००,००० येन, म्हणजेच सुमारे एक हजार डॉलर्स इतकी आहे.

ज्या बोर्डवर ठेऊन भाज्या चिरल्या जातात तश्या एखाद्या चॉपिंग बोर्डच्या आकाराच्या या बर्गरच्या वर अस्सल सोन्याचा वर्ख लावलेला असतो. या बर्गरच्या आतमध्ये असलेल्या पॅटीचे वजन तब्बल एक किलो असून, ही पॅटी, किंवा कटलेट बीफचा वापर करून तयार केले जाते. त्या शिवाय या बर्गरमध्ये खास जपानी चेडर चीज, आणि ‘फॉय ग्रा’ सारखे पदार्थही वापरले जातात. या बर्गर समवेत एक शँपेनची बाटलीही ग्राहकाला दिली जाते.

या बर्गरसाठी लसूण आणि केशराचा वापर करून एक खास प्रकारचा सॉस तयार केला जातो. या बर्गरमध्ये टोमाटो आणि इतर भाज्यांचा वापर केला जात असून, इतरही अनेक पदार्थांचा समावेश या बर्गरमध्ये केला जातो. हा बर्गर ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय ठरत असून, सर्वसामान्य बर्गर आउटलेट्स मध्ये उपलब्ध असणाऱ्या बर्गर्सच्या मानाने हा बर्गर खूपच चविष्ट असल्याची पसंतीची पावती ग्राहकांनी या बर्गरला दिली आहे.

Leave a Comment