यंदाच्या विश्वचषकात 400 धावा ठोकणारा वॉर्नर पहिला फलंदाज


विश्वचषक स्पर्धेत काल झालेल्या बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील 16 वे शतक झळकवले. या सामन्यात त्याने 110 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह विश्वचषक स्पर्धेमधील आपले वैयक्तिक दुसरे शतक पूर्ण केले.

त्याने विश्वचषक स्पर्धेमध्ये पाकिस्तानविरुद्द शतकी खेळी केली होती. त्याने एक वर्षाच्या बंदीनंतर खेळताना विश्वचषक स्पर्धेमध्ये अनुक्रमे नाबाद 89, 3, 56, 107, 26 आणि 166 धावांची खेळी मागील 6 सामन्यात केल्या आहेत.

वॉर्नरने सर्वात वेगवान 16 शतके झळकवण्यात दुसरे स्थान पटकावले आहे. 110 डावात वॉर्नरने 16 शतके केली असून भारताचा कर्णधार विराट कोहलीची त्याने बरोबरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाच्या नावावर सर्वात वेगवान 16 शतके करण्याचा विक्रम आहे.

वॉर्नरवर बॉल टेम्परिंग प्रकरणी एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर फॉर्ममध्ये आलेल्या वॉर्नरने विश्वचषक स्पर्धेमध्ये दोन शतके आणि दोन अर्धशतके केली आहेत. वॉर्नर 2019 च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये 400 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. वॉर्नरच्या 447 धावा झाल्या असून त्याच्यानंतर शाकिब अल हसनच्या 425 धावा झाल्या आहेत. 396 धावांसह अॅरॉन फिंच तिसऱ्या स्थानी आहे.

Leave a Comment