टीम इंडियासाठी दिलासा, विजय शंकर तंदुरुस्त


लंडन – विश्वचषक स्पर्धेत खेळणाऱ्या भारतीय संघाला दुखापतीचे ग्रहण लागतच होते पण त्यात आता दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सराव दरम्यान दुखापत झालेला भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर तंदुरुस्त असल्याची माहिती वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने दिली आहे. विजय शंकरला सरावादरम्यान दुखापत झाली होती. यामुळे तो स्पर्धेमधील पुढील सामन्या खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पण बुमराहने विजय शंकर फिट असल्याचे स्पष्ट केले आहे.


वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचा चेंडू बुधवारी सराव करताना विजय शंकर याच्या पायावर आदळल्यामुळे विजय शंकरच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली. विजय शंकरने यामुळे गुरुवारी सरावामध्ये भाग घेतला नाही. या कारणाने विजय शंकरची दुखापत गंभीर असल्याचे बोलले जात होते.


याविषयी बोलताना बुमराह म्हणाला की, कोणत्याही फलंदाजाला जखमी करण्याच्या उद्देशाने आम्ही गोलंदाजी करत नाही. विजय शंकरला सरावादरम्यान चुकून चेंडू लागला. हा खेळाचा एक भाग आहे. पण विजय शंकर सध्या ठीक असल्याचे त्याने माध्यमांना सांगितले.

Leave a Comment