आठ अब्ज टन बर्फाचे दरवर्षी होत आहे पाणी!


एकीकडे भारत आणि जगभरात भयंकर दुष्काळामुळे लोकांच्या घशाला कोरड पडत असताना दुसरीकडे निसर्गाचे वैभव असलेले नैसर्गिक बर्फ वितळून नष्ट होत आहे. जागतिक तपमानवाढीमुळे हिमालयातील हिमनद्या झपाट्याने वितळत आहेत. या नद्या दरवर्षी आठ अब्ज टन बर्फ वितळवत आहेत, असा धक्कादायक निष्कर्ष कोलंबिया युनिव्हर्सिटी या विद्यापीठाच्या संशोधकांनी काढला आहे. त्यामुळे पर्यावरणाला होणाऱ्या हानीवर पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे.

त्यांचे हे संशोधन सायन्स अॅडवान्सेस या शास्त्रीय नियतकालिकात प्रसिद्ध केले आहे. या संशोधकांनी 1975ते 2016 पर्यंतच्या 41 वर्षांच्या माहितीचे विश्लेषण करून हिमनद्यांमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा अभ्यास केला आहे. त्यासाठी त्यांनी उपग्रहाच्या छायाचित्रांचीही मदत घेतली आहे. अमेरिकेने 1970च्या दशकात हेरगिरीसाठी तब्बल 20 उपग्रहांचे प्रक्षेपण केले होते. या उपग्रहांनी टिपलेली छायाचित्रे अनेक वर्षे गुप्त ठेवण्यात आली होती आणि 2011मध्ये जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर अमेरिकेच्या जिऑलोजिकल सर्व्हे खात्याने ही छायाचित्रे एकत्र करून संशोधकांना सोपविली होती. कोलंबियाच्या संशोधकांनी त्याच छायाचित्रांचा अभ्यास करून हिमालयाच्या दुर्दशेवर नव्याने उजेड टाकला आहे.

त्यांनी हिमालयातील 2000 किलोमीटर लांब पर्वतमालेत वाहणाऱ्या 650 मोठ्या हिमनद्यांचा अभ्यास करून हा चिंताजनक निष्कर्ष काढला आहे, त्यामुळे त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यांच्या मते, या भागातील तपमान 1 डीग्रीने वाढले आहे. दिसायला हे 1 डीग्रीचे तपमान कमी वाटत असले, तरी पर्यावरणात त्यामुळे असामान्य फेरफार होतात. गेल्या 40 वर्षांत या प्रदेशातील एक चतुर्थांश बर्फ नष्ट झालेला असावा, असा अंदाज या संशोधकांचे नेतृत्व करणारे जोशुआ मॉरर यांनी नॅशनल जिओग्राफिक या नियतकालिकाशी बोलताना सांगितले.

या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दशकांपूर्वी, म्हणजे 2000 सालापूर्वी, सरासरी 4 अब्ज टन बर्फ वितळत असे. आज हे प्रमाण दुप्पट झाले आहे. हिमालयातील हिमनद्यांमधील 8 अब्ज टन बर्फ दरवर्षी वितळत आहे. त्यामुळे या हिमनद्या दरवर्षी सरासरी 5 मीटरने कमी होत आहेत. तर या बर्फाचे होणारे पाणी एवढे आहे, की त्यातून ऑलिम्पिकच्या आकाराचे 32 लाख स्विमिंग पूल भरता येतील.

हिमालय हा जगातील अंटार्क्टिका आणि आर्क्टिक प्रदेशानंतरचा (उत्तर व दक्षिण ध्रुव) बर्फाचा तिसरा मोठा साठा आहे आणि हिमनद्या म्हणजे हिमालयातून धावणाऱ्या नद्यांचे मूळ होत. म्हणून हा एक गंभीर विषय आहे, कारण जर नद्यांमधून वाहणाऱ्या पाण्याच्या मुळातच जर पाणी कमी होऊ लागले तर नद्यांमध्ये पाणी कुठून येईल? हिमालय हा जगातील जवळपास 150 कोटी लोकांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत आहे. हिमालय पर्वतरांगेत साधारणपणे 15,000 विविध हिमनद्या आहेत ज्यात 12,000 वर्ग किमी इतके पाणी सामावले आहे.सियाचीन हिमनदी ही अध्रुवीय प्रदेशातील दुसरी सर्वांत मोठी हिमनदी असून तिची लांबी 70 किमी आहे.

या शतकाच्या शेवटापर्यंत यातील बहुतेक हिमनद्यांचा अंत झालेला असेल, असा निर्वाणीचा इशारा संशोधकांनी दिला आहे. यमुना, सतलज, यांगत्झे, ब्रह्मपुत्रा अशा अनेक नद्या या हिमनद्यांवर अवलंबून आहेत. उत्तराखंडमधील गंगोत्री, यमुनोत्री, पिंडारी व काफनी हिमनदी, नेपाळ मधील एव्हरेस्टच्या सानिध्यातील खंबू हिमनदी या काही प्रसिद्ध हिमनद्या आहेत. या नद्यांच्या काठी 80 ते 100 कोटी लोक राहतात. बर्फ वितळणे याचा अर्थ या नद्यांतील पाणी आटणे. मोठ्या नद्यांमधील पाणी कमी झाले तर त्याची लगेच जाणीव होत नाही, मात्र नदीच्या आजूबाजूच्या भागातील भूजलाचा स्तर कमी होऊ लागतो. हे पाणी कमी होण्याचे पहिले लक्षण आहे.

हिमनदी वितळण्याचा आणखी एक फटका बसतो तो म्हणजे नद्यांचे प्रवाह नियंत्रणात राहत नाहीत. हिमालयाच्या भागात गेल्या काही वर्षांत अचानक आलेल्या पुरांचे प्रमाण वाढले आहे. त्याला फ्लॅश फ्लड म्हणतात. बिहारमधील कोसी नदीचा पूर, उत्तराखंडमधील 2013मध्ये आलेला पूर त्याची काही ठळक उदाहरणे.

हिमालय हा भारताचा मानबिंदू. मात्र तो अर्ध्या-अधिक भारताचा अन्नदाता आणि जीवनदाताही आहे. मात्र आज तपमानवाढीच्या फेऱ्यात सापडलेल्या या पर्वतराजाला आपली नैसर्गिक संपत्ती कायम ठेवणेही कठीण झाले आहे. त्याचा सर्वाधिक प्रभाव भारतीयांवर पडणार असल्यामुळे भारतीयांनी त्याची खास चिंता करावी.

Leave a Comment