चंद्राबाबूंना ग्रहण कमळाचे


तेलुगु देसम पक्षाच्या (टीडीपी) चार राज्यसभा खासदारांना घाऊक प्रवेश देऊन भारतीय जनता पक्षाने चंद्राबाबू नायडूंना जोरदार धक्का दिला आहे. केवळ काही आठवड्यांपूर्वी पुढचा पंतप्रधान असल्याच्या थाटात मिरविणाऱ्या आणि राष्ट्रीय राजकारणाची सूत्रे हलवू पाहविणाऱ्या नायडूंना जमिनीवर आणण्यासाठी हा मोठा फटका आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा दुहेरी धक्का पचवू पाहणाऱ्या नारा चंद्राबाबू नायडू यांना आता हा तिसरा धक्का पचवाला लागणार आहे. एक प्रकारे चंद्राबाबूंना कमळाचे ग्रहण लागले आहे.

राज्यसभेतील टीडीपीच्या चार खासदारांनी पक्षाचा राजीनामा देऊन भाजपशी घरोबा केला. चारही खासदारांनी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा आणि भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. सी. एम. रमेश, सुजना चौधरी, टी. जी. वेकटेश, जी. मोहन राव या चार सदस्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. मात्र अशा प्रकारचे संकट आमच्यासाठी नवे नाही, असे नायडू यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

चंद्राबाबू नायडू अध्यक्ष असलेल्या टीडीपीचे राज्यसभेत सहा सदस्य असून पक्षांतरबंदी कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई होऊ शकत नाही.कारण एखाद्या पक्षाच्या दोन तृतीयांश सदस्यांनी पक्षांतर केल्यास त्यांच्या नव्या गटाला मान्यता मिळते. राज्यसभेची एकूण सदस्य संख्या 245 आणि भाजपचे सर्वाधिक 71 आहेत. मात्र लोकसभेत भाजपकडे प्रचंड बहुमत असले तरी राज्यसभेत भाजप अल्पमतात आहे. त्यामुळे या चार खासदारांचे बळ मिळाल्यानंतर भाजप वरिष्ठ सभागृहातही बळकट होईल.

चंद्राबाबू हे सध्या युरोपमध्ये सुट्टी घालवत आहेत आणि त्यांच्या अनुपस्थितीतच ही घडामोड घडली आहे. चंद्राबाबू सुट्टीसाठी आपल्या कुटुंबासह युरोपला निघून गेल्यानंतर भाजपने चित्याच्या चपळाईने चाल खेळली. मोदी आणि अमित शाह यांनी अत्यंत धूर्तपणे आंध्र प्रदेशात टीडीपीला संपविण्यासाठी डाव खेळले. मोदी-शाहची जोडगोळी आज नाही उद्या असे काही करेल या अंदाज टीडीपीच्या कार्यकर्त्यांना होताच, मात्र भाजप इतक्या लवकर असे काही करेल असे त्यांना वाटले नव्हते. फक्त तीन लोकसभा जागांवर विजय मिळविलेल्या टीडीपीला आता ते खासदार तरी पक्षात राहतात की नाही, याची धास्ती वाटली तर आश्चर्य नाही.

मात्र चंद्राबाबूंचे हे ग्रहण येथेच संपणारे नाही. दिल्लीत त्यांचे पंख कापल्यानंतर, म्हणजे त्यांच्या खासदारांना फोडल्यानंतर, भाजप त्यांच्या गृहराज्यातही झडप घालण्याच्या तयारीत आहे. भाजपचा तो मनसुबा पूरा झाला तर आंध्रप्रदेश विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षाचे स्थानही टीडीपीला गमवावे लागेल. आंध्र प्रदेशातील आपला आधार मजबूत करण्यासाठी भाजपने टीडीपीच्या नेत्यांसाठी आपले दरवाजे उघडले आहेत. आंध्र प्रदेशात टीडीपीचे 23 आमदार आहेत आणि त्यांना फोडायचे झाल्यास भाजपला 17 आमदार फोडावे लागतील. अशा प्रकारे दोन तृतीयांश आमदार फोडायच्या तयारी भाजप आहे, अशी आंध्रात चर्चा आहे.

तसे झाल्यास टीडीपीचे आंध्रातील विरोधी पक्षाचे स्थानही जाईल कारण विधानसभेच्या नियमांनुसार, विरोधी पक्षाचे स्थान मिळण्यासाठी एखाद्या पक्षाला सभागृहात 10% जागा असायला हव्यात. म्हणजेच 175 सदस्यांच्या आंध्र प्रदेशात टीडीपीकडे कमीत कमी 18 आमदार असले तरच त्या पक्षाला विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळेल आणि चंद्राबाबू नायडू विरोधी पक्षनेते म्हणून काम करू शकतील. अगदी सहा आमदारांनी जरी टीडीपीला टाटा केला तरी त्या पक्षाचे ते स्थान धोक्यात येऊ शकते, इतकी नाजूक स्थिती तिथे आहे. ”या क्षणी टीडीपीचे किती आमदार आमच्या पक्षात सामील होणार आहेत हे मी सांगू शकत नाही. पण मला खात्री आहे, की टीडीपीचे बहुतेक आमदार आमच्या नेतृत्वाशी संपर्कात आहेत, ” असे भाजपचे उपाध्यक्ष एस. विष्णुवर्धन रेड्डी यांनी म्हटले आहे.

सुमारे चार दशकांच्या आपल्या राजकीय कारकीर्दीतील सर्वात वाईट पराभवाला सामोरे गेलेल्या आणि राष्ट्रीय राजकारणात प्रासंगिकता गमावलेल्या चंद्राबाबू नायडू यांच्या समोरचे हे सर्वात मोठे आव्हान आहे. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत नायडू यांनी डावीकडून उजवीकडे अशा सर्व टोकांकडे प्रवास कला. गेल्या वर्षी तर त्यांनी आपला कट्टर प्रतिस्पर्धी काँग्रेसशीही जुळवून घेतले. निवडणुकांच्या पूर्वी आणि दरम्यान, नायडू हे विविध पक्षांच्या नेत्यांसह बैठका घेत होते. राष्ट्रीय राजकारणात प्रासंगिक राहण्यासाठी भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांच्या भाग्याने साथ दिली नाही.

चिरंजीव नारा लोकेश यांचाही पराजय झाल्यामुळे त्यांना राजकीय वारसदार बनवण्याचेही नायडू यांचे स्वप्न उद्ध्वस्त झाले आहे. आज नायडू हे 69 वर्षांचे आहेत आणि पाच वर्षांनंतर पक्षाच्या मोहिमेचे नेतृत्व करण्याची शारीरिक आणि मानसिक क्षमता त्यांच्यात असेलच असे नाही. आता राष्ट्रीयच नव्हे तर राज्याच्या राजकारणातही आपली जागा कायम ठेवण्यासाठी त्यांना खूप झगडावे लागणार हे नक्की.

Leave a Comment