भारतातील पहिले डिजिटल गार्डन केरळमधील राजभवनामध्ये


केरळ राज्यामध्ये भारतातील सर्वप्रथम आणि सध्याच्या काळामध्ये एकमेव डिजिटल गार्डन तयार करण्यात येत असून, तिरुवनंतपुरम येथे असलेल्या केरळ राज्याच्या राज्यपालांच्या औपाचारिक निवासस्थानी असलेल्या उद्यानाचे परिवर्तन डिजिटल गार्डनमध्ये करण्यात येत आहे. येथील उद्यानामध्ये असलेल्या सर्व लहानमोठ्या झाडांवर, वेलींवर आता ‘क्यूआर’ ( क्विक रीस्पॉन्स ) कोड्स लावण्यात येत असून, हे क्यूआर कोड्स स्कॅन करताच त्या झाडाविषयीची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. ‘कनककन्नू’ या नावाने प्रसिद्ध असलेले हे उद्यान बारा एकरांच्या परीसरामध्ये विस्तारलेले असून, या उद्यानामध्ये १२६ निरनिराळ्या प्रकारच्या प्रजातींची हजारो झाडे आहेत. या सर्व झाडांची माहिती आता डिजिटल क्यूआर कोड्स द्वारे सहज उपलब्ध होऊ शकणार आहे.

हा उपक्रम सध्या प्रायोगिक पातळीवर सुरु करण्यात आला असून, सुरुवातीला केवळ सहाशे झाडांवर क्यूआर कोड्स लावण्यात आले आहेत. इतर झाडांवरही क्यूआर कोड्स लावण्याचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. या कामामध्ये केरळ विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचा सहयोग लाभत आहे. तिरुवनंतपुरम येथील राजभवनातील उद्यानाप्रमाणेच आता दिल्ली येथील ल्युटीयेन्स झोनमधील लोधी गार्डनमधील शंभर वृक्षांना क्यूआर कोड्स लावण्यात आले असून, यातील काही झाडे शंभर वर्षांपेक्षाही अधिक जुनी आहेत. क्यूआर कोड्स लावल्याने या झाडांविषयी लोकांना माहिती देणे सहजसाध्य व्हावे यासाठी या झाडांना क्यूआर कोड्स लावण्यात येत आहेत.

झाडांची माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा प्रयोग भारतामध्ये नव्याने होत असला, तरी जगातील अन्य काही देशांमध्ये हा उपक्रम फार आधीपासूनच अंमलात आणला गेला आहे. अमेरिका आणि जपान या देशांमध्ये झाडांचे क्यूआर कोडींग अनिवार्य असून फोनवर झाडांचा कोड स्कॅन केल्याने त्वरित त्या झाडाची माहिती फोनवर उपलब्ध होऊ शकते. या उपक्रमामुळे झाडांना आता स्वतःची ओळख लाभली असून, निसर्गाच्या प्रती लोकांची मानसिकता बदलण्यात यश आल्याचेही वनस्पतीशास्त्रज्ञ म्हणतात.

Leave a Comment