जपानी लोकांच्या सडपातळपणाचे आणि चिरतारुण्याचे हे आहे रहस्य


जपान देशातील लोक, विशेषतः महिला, सुंदर, सडपातळ देहयष्टीचे आणि चिरतरुण समजले जातात. जपानी लोकांची आयुर्मर्यादाही जगातील इतर देशांतील लोकांच्या आयुर्मर्यादेच्या मानाने जास्त असते. जपानी जीवनशैली, खानपानाच्या पद्धती, ही त्यामागची मुख्य कारणे आहेत. मात्र एखाद्या जपानी महिलेला जर तिच्या चिरतारुण्याचे आणि सडपातळपणाचे रहस्य विचारले, तर काय उत्तर द्यावे हे तिला ही कळणार नाही, कारण त्यांनी आत्मसात केलेल्या जीवनशैली आणि खानपानाच्या पद्धती त्यांच्याकडे वर्षानुवर्षे चालत आल्या आहेत, त्यामुळे सडपातळ आणि चिरतरुण राहण्यासाठी त्यांना वेगळे काहीच करावे लागत नाही.

जपानी लोकांच्या चिरतारुण्याचे आणि सडपातळपणाचे रहस्य समजून घेण्यासाठी त्यांची जीवनशैली कशी आहे ते पाहणे आवश्यक ठरते. जपानी लोकांच्या दररोजच्या आहारामध्ये ग्रीन टीचे महत्व मोठे आहे. हा ग्रीन टी कॅमेलिया सिनेन्सीस नामक झुडुपाच्या पानांपासून बनविला जातो. ग्रीन टी अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण असून, रक्तस्राव रोखण्यासाठी, पचनशक्ती सुधारण्यासाठी, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी आणि शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी सहायक आहे. त्याचप्रमाणे आंबविलेल्या (फेर्मेन्टेड) अन्नपदार्थांचा समावेश जपानी आहारामध्ये जास्त आहे. अन्न पदार्थ आंबविण्याच्या प्रक्रियेमुळे त्या अन्नपदार्थांमध्ये शरीराला लाभकारी एन्झाइम्स तयार होत असतात. तसेच हे अन्नपदार्थ ओमेगा थ्री फॅटी अॅसिड्स आणि प्रोबायोटिक्सने परिपूर्ण असतात. जपानी आहारामध्ये साऊअरक्राउट (आंबट दह्याप्रमाणे पदार्थ), किमची, दही, टेम्पेह्, भाज्यांची मुरविलेली लोणची आणि मिसो सूप हे पदार्थ नेमाने खाल्ले जात असून हे सर्व पदार्थ आंबवून किंवा मुरवून तयार केले जात असतात.

जपानी आहारामध्ये समुद्री खाद्याचे प्रमाणही मोठे आहे. यामध्ये स्क्विड, मासे, ऑक्टोपस, ईल, शेलफिश इत्यादी समुद्री जीवांचा समावेश असून, हे समुद्री जीव दररोज खाल्ल्या जाणाऱ्या सुशी, सॅलड्स, निरनिराळी कालवणे, टेम्पुरा इत्यादी पदार्थांमध्ये वापरण्यात येत असतात. समुद्री खाद्यामध्ये जीवनसत्वे, प्रथिने, क्षार आणि इतर पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असल्याने यांच्या सेवनाने त्वचेचे आरोग्य उत्तम राहते. या पदार्थांचे सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी देखील उत्तम आहे. या पदार्थांच्या नियमित सेवनाने वाढत्या वयामध्ये उद्भवणारे संधिवात, किंवा दृष्टीदोषासारखे आजार लांब राहतात.

जपानी भोजन घेण्याची पद्धत पाहिल्यास जपानी लोक भोजन अतिशय अल्प प्रमाणात घेतात. सर्वसामान्य जपानी भोजनामध्ये भात किंवा नूडल्सचा समावेश असतो. त्यासोबत मासे, चिकन, पोर्क किंवा बीफ, असून, भाज्यांची लोणची, आणि मिसो सूप, असे हे भोजन असते. हे सर्व पदार्थ एकत्र, एकाच प्लेटमध्ये वाढून न घेतले जाता, लहान लहान बश्यांमध्ये वाढले जातात. त्यामुळे आपोआपच भोजन अल्प मात्रेमध्ये घेतले जाते. अल्प मात्रेमध्ये भोजन घेतले जात असल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. जपान देशामध्ये पायी चालण्याचे महत्व मोठे आहे. जपान देशामध्ये बौद्ध धर्माचे अनुयायी मोठ्या प्रमाणावर असून, त्यांच्यासाठी चालण्याची क्रिया ध्यानधारणेसमान मानली जाते. त्यामुळे कुठे जायचे असल्यास चालत जाणे, अथवा सायकलने जाणे हा जपानी लोकांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे शरीराला आवश्यक असणारा दैनंदिन व्यायाम या लोकांना आपोआपच मिळत असतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment