हे आहे ब्रिटनमधले सर्वात चिमुकले घर – ‘क्वे हाऊस’


ब्रिटनमधील वेल्स प्रांतामध्ये कोन्वी या ठिकाणी असलेले ‘द क्वे हाऊस’ हे घर ब्रिटनमधील सर्वात लहान घर म्हणून प्रसिद्ध असून, येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. हे चिमुकले घर सोळाव्या शतकामध्ये बांधण्यात आले असून, त्यापुढे तीन शतकांपर्यंत, म्हणजेच एकोणिसाव्या शतकापर्यंत या घरामध्ये अनेक लोकांनी वास्तव्य केले. सहा फुट तीन इंच उंचीचा रॉबर्ट जोन्स नामक मच्छीमार या घरातील शेवटचा निवासी ठरला. इतक्या अवाढव्य आकाराच्या मनुष्यासाठी इतके लहानसे घर राहण्याच्या दृष्टीने अयोग्य असल्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतल्यामुळे रॉबर्टला या घरातून बाहेर पडावे लागले. या घराचा मालकीहक्क आजही रॉबर्टच्या वंशजांकडे असून, रॉबर्टच्या सर्व वस्तू आजही या घरामध्ये जपून ठेवण्यात आल्या आहेत.

‘कोन्वी कासल’च्या नजीक हे घर असून, या घराचा आकार अवघा दहा फुट बाय सहा फुट असला, तरी आश्चर्य असे, की या इतक्याशा घरालाही दोन मजले आहेत. खालच्या मजल्यावर बैठकीची खोली, कोळसा साठवणीची एक लहानशी खोली, एक शेकोटी, आणि वरच्या मजल्यावर जाणाऱ्या जिन्याखाली पाण्याचा नळ आहे. घराच्या वरच्या मजल्यावर एक लहानशी बेडरूम आणि कपडे व इतर वस्तू ठेवण्यासाठी स्टोर रूम आहे. हे घर पाहण्यासाठी आवर्जून येथे येणाऱ्या पर्यटकांना एक पौंड प्रवेशशुल्क भरावे लागत असून, लहान मुलांसाठी अर्धे प्रवेशशुल्क भरावे लागते.

घराच्या प्रवेशद्वाराशी पारंपारिक वेल्श पोषाखामध्ये सजलेली एक महिला पर्यटकांचे स्वागत करते, आणि पर्यटकांना हे घर आतून दाखविण्याबरोबर या घराबद्दलची माहितीही देत असते. हे घर आता अगदी जुने झाले असल्यामुळे या घराच्या वरच्या मजल्यावर जाणारा जिना काहीसा मोडकळीला आला आहे. त्यामुळे पर्यटकांना वरच्या मजल्यावर जाता येणे शक्य होऊ शकत नाही. ‘क्वे हाऊस’ मार्च ते नोव्हेंबर या महिन्यांमध्ये पर्यटकांना पाहण्यासाठी खुले करण्यात येते. अलीकडच्या काळामध्ये आसपास बनत असलेल्या उंच उंच इमारतींच्या गर्दीमध्ये हे घर लपले असले, तरी आज इतकी शतके उलटून गेल्यानंतरही ब्रिटनमधील हे सर्वात लहानसे घर मोठ्या दिमाखाने उभे आहे.

Leave a Comment