
मॅनचेस्टर : विश्वचषक स्पर्धेदरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा धमाकेदार सलामीवीर शिखर धवन हा संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला आहे. शिखर धवनच्या अंगठ्याला ९ जूनरोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्या दरम्यान दुखापत झाली होती. शिखर धवनने या सामन्यात ११७ धावांची खेळी केली होती.
विश्वचषक स्पर्धेतून शिखर धवन अखेर बाहेर
शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली असली तरी आयसीसीकडे टीम इंडियाने बदली खेळाडूची मागणी केली नव्हती. १०-१२ दिवसात धवनची दुखापत बरी होईल, असा अंदाज होता. पण धवनची दुखापत बरी व्हायला ४ आठवड्यांचा कालावधी लागणार असल्यामुळे बीसीसीआय आता आयसीसीकडे बदली खेळाडूला परवानगी द्यावी अशी मागणी करणार आहे.
शिखर धवनऐवजी संघामध्ये ऋषभ पंत याची निवड केली जाणार आहे. शिखर धवनची दुखापत बघता याआधीच ऋषभ पंतला इंग्लंडमध्ये पर्याय म्हणून पाठवण्यात आले आहे. ऋषभ पंतचा संघामध्ये आयसीसीची परवानगी मिळाल्यानंतर समावेशाचा मार्ग मोकळा होईल.
शिखर धवनऐवजी १६ जूनला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केएल राहुल सलामीला आला होता. या सामन्यामध्ये राहुलने ५७ धावा केल्या होत्या. राहुलने रोहितसोबत १३६ धावांची सलामी दिली होती. विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा पुढचा सामना २२ जूनरोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. ऋषभ पंतला या सामन्यात संधी मिळते का हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
