अमेरिकेतही जात नाही ती जात!


असे म्हणतात, की जात नाही ती जात. भारतात सर्व धर्मांत, सर्व प्रांतात आणि सर्व थरांमध्ये आढळणारी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे जात. भारतात काही प्रमाणात का होईना जातीचा भेदभाव कमी होत आहे. तरीही भारतीयांनी आपली ही सवय साता समुद्रापारही नेल्याचे एका ताज्या संशोधनातून समोर आले आहे.

आपला समाज कितीही पुढारलेला असला तरी लग्नाचा जेव्हा विचार येतो तेव्हा जातीपातीचा विचार केला जातोच. भारतात खासकरून उत्तरेकडील राज्यांमध्ये राहणारे लोक आंतरजातीय विवाहाबाबत जास्त उदार होत आहेत. मात्र परदेशात, त्यातही अमेरिकेत राहणाऱ्या, भारतीयांमध्ये आजही जातपात पाहूनच लग्न केले जाते, असे या संशोधनातून दिसून आले आहे. अमेरिकेतील मिशिगन यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनातून ही बाब उघड झाली आहे. अश्विन राजदेसिंगन नावाच्या अभ्यासकाने हे संशोधन केले असून त्यासाठी त्यांनी भारतातील वैवाहिक संकेतस्थळावरील (मॅट्रिमोनिअल वेबसाईट्स) 3 लाख 13 हजार प्रोफाईलचा अभ्यास केला.

अमेरिकेत राहणारे भारतीय तुलनात्मकदृष्ट्या आंतरजातीय विवाहासाठी कमी उदार असतात. लोक त्यांना आपली सांस्कृतिक ओळख कायम ठेवण्यासाठी काळजी घेण्याचा सल्ला देतात कारण परदेशात ते अल्पसंख्यक असतात. अमेरिकेतील केवळ 14 टक्के भारतीय लोक आंतरजातीय लग्न करण्याला महत्त्व देतात, तर उत्तर भारतात हेच प्रमाण 21 टक्के आहे, असे राजदेसिंगन यांच्या या संशोधनात दिसले आहे.

या संकेतस्थळावर आपली प्रोफाईल मांडणाऱ्यांना एक प्रश्न करण्यात आला होता, की आंतरजातीय लग्न करण्यात त्यांना रस आहे का नाही? भारतात लग्नासाठी जात, शिक्षण, समृद्धी, जन्मकुंडली आणि शारीरिक ठेवणीला खूप महत्तव दिले जाते. भारतीयांनी आपली ही परंपरा परकीय भूमीवरही जपल्याचेच हे संशोधन सिद्ध करते.

याच सोबत उत्तर भारतीयांच्या तुलनेत दक्षिण भारतीय लोक अद्यापही आपल्या जुन्या मुळांना धरून असल्याचे हे संशोधन सांगते. दाक्षिणात्य लोक आजही आपल्या संस्कृती व परंपरांना महत्त्व देतात.

“सरकार व सामाजिक गटांनी कितीही प्रयत्न केले, तरी जात ही लोकांच्या जीवनातील एक महत्त्वाची गोष्ट आहे. जातीबद्दलचा हा प्रश्न वास्तविकतः प्रश्नावलीच्या पहिल्याच पानावरच असतो, यावरून लोक त्याला किती महत्त्व देतात, हे समजून येईल. या संकेतस्थळांवर लोक लग्न करण्याच्या हेतूने येतात त्यामुळे त्यांचे उत्तर हे त्यांचे प्रामाणिक मत मानायला हरकत नसावी,” असे राजदेसिंगन यांनी सांगितले.

मात्र राजदेसिंगन यांच्या या पाहणीत काही सकारात्मक पैलूही आहेत. सरकारी प्रोत्साहन आणि सामाजिक चळवळींमुळे आंतरजातीय लग्नाबाबत लोकांचा दृष्टिकोन आणि व्यवहार यात खूप फरक पडला आहे, असे त्यात दिसले आहे. भारतीय घटनेने जातीयता नष्‍ट केली आहे. ती पाळणा-यास शिक्षा तसेच दंडाचीही तरतूद आहे. त्यात आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन हे जातीयता नष्‍ट करण्‍यासाठी साहायक ठरत असल्याचे तज्ञांचे मत आहे. म्हणून आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार 50 हजारांचे अर्थसाहाय्य दिले जाते.

राजदेसिंगन यांच्या पूर्वी डेविड जुर्गेंस यांनीही असेच संशोधन केले होते. शिक्षणाचा वाढता प्रभाव, ग्रामीण भागातील वास्तव्य, महिलांची नोकरी करणे आणि तथाकथित खालच्या जातींबद्दल बदललेली भावना यामुळे हा फरक पडला आहे. याशिवाय युवा पिढीच्या विचारांमध्ये झालेला बदल हाही त्याला सर्वाधिक कारण आहे, असे जुर्गेंस यांचे म्हणणे आहे. यापूर्वी 2014 मध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात भारतातले केवळ 5 टक्के विवाह हे आंतरजातीय विवाह असल्याचे समोर आले होते. नॅशनल काउन्सिल फॉर अप्लाइड इकानॉमिक्स रिसर्च या संस्थेने ते संशोधन केले होते.

जात हा भारतीय समाजाला लागलेला अभिशाप आहे. या शापाचे निर्मूलन करण्यासाठी अनेक समाज सुधारकांनी आपले जीवन वाहिले. संत एकनाथापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातिभेदाच्या या कर्मकांडावर प्रहार केले. तरीही जात ही आजही आपल्यामध्ये ठाण मांडून बसली आहे. जातींचे समूळ उच्चाटन करणे हे एक किंवा दोन शतकांपूर्वी होते तसेच आजही सर्वात निर्णायक आव्हान आहे. जातींचे निर्मूलन होईल तेव्हा होईल, परंतु त्या दिशेने वाटचाल करणे हेही आपल्याला एक प्रचंड आव्हान आहे, हेच या ताज्या संशोधनाने पुन्हा दाखवून दिले आहे. भारतीयांच्या जीवनात जातीचा विचार किती खोलवर रुजला आहे याची ही जळजळीत मांडणी आहे. एकविसाव्या शतकात वावरणाऱ्या भारताच्या डोळ्यात हे एक झणझणीत अंजन आहे.

Leave a Comment