एकवीस शूरवीरांनी असे लढले सरगढीचे युद्ध


तब्बल दहा हजार अफगाणांना मोठ्या धैर्याने तोंड देऊन लढलेल्या ब्रिटीश इंडियन आर्मीच्या एकवीस शूर शिख सैनिकांची ही वीरगाथा आज ‘द बॅटल ऑफ सरगढी’ या नावाने आजही भारतीय इतिहासामध्ये अंकित आहे. अफगाण पश्तून जमातीचे दहा हजार सैनिक आणि ब्रिटीश-भारतीय सैन्यातील एकवीस शिख जवान यांच्यातील हे युद्ध बारा सप्टेंबर १८९७ साली झाले. अफगाणिस्तानातील सरगढीच्या चौकीवर हे युद्ध जुंपले. त्या काळी हा भाग नॉर्थ-वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स म्हणून ओळखला जात असे. सरगढी येथील चौकीवर एक ‘सिग्नलिंग टॉवर’ आणि असे. याच सरगढी चौकीच्या संरक्षणार्थ एकवीस शिख सैनिकांनी तब्बल दहा हजारांच्या फौजेचा मुकाबला केला.

या शिख जवानांच्या तुकडीचे नेतृत्व हवलदार इशर सिंह यांच्याकडे असून, दहा हजारांच्या फौजेपुढे गुडघे न टेकता या लढवय्यांनी त्यांना निकराची झुंज दिली. या युद्धाच्या दरम्यान हेलियोग्राफचा वापर करीत फोर्ट लॉकहार्ट येथे असलेल्या कर्नल हॉटन यांच्या पर्यंत संदेश पोहोचविण्याचे काम शिपाई गुरमुख सिंह याने चोख बजाविले. त्या दिवशी सकाळी नऊच्या सुमाराला अफगाणांची फौज सरगढीच्या नजीक येऊन थडकली. त्या क्षणी हेलियोग्राफच्या माध्यमातून फोर्ट लॉकहार्ट येथे मदतीचा संदेश पाठविला गेला असता, अतिरिक्त कुमक तात्काळ पाठविली जाणे शक्य नसल्याचे कर्नल हॉटन यांनी कळविले.

अतिरिक्त कुमक येऊन सहायता मिळण्याची शक्यता शून्य असतानाही सरगढीवर तैनात आलेल्या एकवीस शिख सैनिकांनी कोणत्याही किंमतीवर चौकी हातची जाऊ न देण्याचा निर्धार केला. त्याकरता आपले प्राण पणाला लावून लढण्यासाठी सर्व सैनिक तयार झाले. एव्हाना सरगढीच्या किल्ल्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न अफगाण फौजांनी सुरु केला. एकीकडे प्रवेशद्वारे उघडून, शरण येऊन अफगाण फौजेला आतमध्ये येऊ देण्यासाठीही फौजेने निरनिराळे हातखंडे वापरण्यास सुरुवात केली. त्यांनी शिख सैनिकांना धमकाविले, भिती घातली, जीवनदान देण्याचे आमिषही दाखविले, पण शिख सैनिक बधले नाहीत. अखेरीस अफगाण फौजांच्या तोफांनी जेव्हा सरगढीची तटबंदी ढासळली, तेव्हा हिम्मत न सोडता धैर्याने लढणे इतकेच काय त्या एकवीस बहाद्दरांच्या हाती उरले.

सरगढीची तटबंदी ढासळल्यानंतर अफगाण फौजा आत घुसल्या आणि हातघाईची लढाई जुंपली. शिख सैनिक निकराची झुंज देत होते आणि तेवढ्यात त्यांच्यातील शिपाई भगवान सिंह कोसळला. त्या एकवीस वीरांच्या पैकी पहिला बळी जाणारा हा वीर होता. शिपाई जीवा सिंह आणि नायक लाल सिंह यांनी मृत भगवान सिंहचे शरीर चौकीमध्ये परत आणले. या सैनिकांचे नेतृत्व करीत असलेल्या हवलदार इशर सिंहने इतर सैनिकांना गढीच्या आत परतण्यास सांगून स्वतः गढीच्या बाहेरच थांबून अफगाणी फौजांना रोखण्याचा निर्णय घेतला. पण अखेरीस या एकवीस वीरांवर दहा हजाराची अफगाणी फौज भारी पडली आणि सरतेशेवटी सर्व शिख सैनिक या युद्धामध्ये कामी आले. पण त्यापूर्वी या वीरांनीही अनेक अफगाणी सैनिकांना यमसदनी धाडले. हेलियोग्राफद्वारे सातत्याने संदेश पाठविण्याची जबाबदारी असलेला गुरमुख सिंह ही अखेरीस या युद्धामध्ये कामी आला.

सरगढी शत्रूच्या हाती पडते आहे असे पाहून गुरमुख सिंहाने संदेश पाठविण्याचे काम थांबवून हाती शस्त्र घेऊन युद्धामध्ये सामील होण्याची परवानगी कर्नल हॉटन यांच्याकडे हेलिओग्राफ़द्वारे संदेश पाठवून मागितली होती. एकट्या गुरमुख सिंहने तब्बल वीस अफगाणी सैनिकांना यमसदनी धाडले, मात्र अखेरीस अफगाणी फौजेने सरगढीची चौकी पेटवून दिल्याने याच आगीमध्ये जळून गुरमुखचा मृत्यू झाला. सरगढीनंतर फोर्ट गुलिस्तान काबीज करण्याचा अफगाण फौजेचा विचार होता. पण सरगढीच्या बहादूर शीख जवानांनी या फौजेला यशस्वीरित्या थोपवून धरल्याने सरगढी काबीज करून फोर्ट गुलिस्तान येथे पोहोचण्याच्या आधीच भारतीय-ब्रिटीश सैन्याची अतिरिक्त कुमक फोर्ट गुलिस्तान येथे पोहोचली होती. या शिख सैनिकांनी सुमारे सहाशे अफगाणी सैनिकांना यमसदनी धाडले. त्यांच्या या पराक्रमाबद्दल या सर्व शिख सैनिकांना मरणोपरांत सैन्याचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला.

Leave a Comment