मोरपंखीचे झाड घरात असणे शुभ, म्हणते वास्तूशास्त्र


घराच्या सजावटीमध्ये घराच्या आसपासची झाडे, घराच्या आतमध्ये असलेली फुलझाडे, किंवा इतर शोभेची झाडे यांची फार महत्वाची भूमिका असते. या झाडांमुळे घराच्या सजावटीची सुंदरता वाढतेच त्याशिवाय घरातील दूषित हवा शुद्ध करण्याची मोलाची कामगिरी देखील ही झाडे करीत असतात. घराच्या आतमध्ये आणि घराच्या बाहेर अनेक तऱ्हेची झाडे लावता येऊ शकतात. त्यामध्ये मोरपंखीचे झाड हे घरासाठी अतिशय शुभ असल्याचे वास्तूशास्त्र म्हणते. या झाडामुळे घरामध्ये सकारात्मक वातावरण रहात असून, घरामध्ये धनसंपत्तीची कधीही कमतरता होत नसल्याचे म्हटले जाते. हे झाड घरामध्ये लावायचे झाल्यास ते कशा प्रकारे लावले जावे या बद्दल वास्तूशास्त्रामध्ये काही निश्चित नियम सांगितले गेले आहेत.

हे झाड जेव्हाही घरामध्ये लावायचे असेल तेव्हा एकच झाड न लावले जाता, दोन झाडे लावली जावीत. यामुळे घरातील पती-पत्नींचे परस्परांमधील संबंध चांगले राहत असल्याचे म्हटले जाते. तसेच या झाडांमुळे घरामध्ये नकारात्मक उर्जेचे संचरण होत नाही. ही झाडे कुंड्यांमध्ये लावली गेल्यास या कुंड्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ ठेवल्या जाव्यात. यामुळे घरामध्ये नेहमी लक्ष्मीचा वास टिकून रहातो. काही वेळा काही कारणामुळे मोरपंखीचे झाड सुकू लागते. अशा वेळी मोरपंखीचे त्वरित दुसरे झाड लावावे. मोरपंखीच्या झाडाला नियमित पाणी घालत जावे. हे झाड पाण्याअभावी सुकणार नाही याची काळजी घ्यावी.

मोरपंखी या झाडाचा उल्लेख धार्मिक ग्रंथांमध्येही आढळतो. या उल्लेखांच्या अनुसार मोरपंखीची झाडे घरामध्ये लावल्याने घरातील लहान-मोठे वाद, तणाव संपुष्टात येऊन घरातील वातावरण सकारात्मक, तणावरहित आणि प्रसन्न राहते. या झाडाला नियमित पाणी देणे आवश्यक असून, ज्या ठिकाणी थोडा सूर्यप्रकाश येत असेल, अशा ठिकाणी ही झाडे ठेवल्याने यांची वाढ व्यवस्थित होते.

Leave a Comment