‘पाकिस्तानच्या फलंदाजांना काय देणार सल्ला’ या प्रश्नावर रोहित शर्माचे मार्मिक उत्तर


सध्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट सामने सुरु असून, रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्याकडे सर्वांचेच लक्ष होते. आयसीसी विश्वचषक स्पर्धा सध्या इंग्लंडमध्ये सुरु असून, भारत-पाकिस्तान मधील सामना ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानावर खेळला गेला. नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तानच्या कर्णधाराने भारताच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले. या संधीचा फायदा घेत भारतीय फलंदाजांनी धावांचा डोंगर उभा केला. ३३७ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानामध्ये उतरलेला पाकिस्तानी संघ, भारताची उत्तम गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण यांच्यापुढे साफ कोलमडला, आणि भारतीय संघाने हा सामना जिंकला.

भारताच्या यशामध्ये भारताचा उपकर्णधार आणि ओपनिंग बॅट्समन रोहित शर्मा याचा मोलाचा वाटा असून, त्याने दर्जेदार कामगिरी करीत १४० धावा फटकविल्याने त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ घोषित करण्यात आले. यावेळी रोहित शर्मा प्रसारमाध्यमांशी बोलत असताना एका पाकिस्तानी पत्रकाराने ‘पाकिस्तानच्या फलंदाजांना तुम्ही काय सल्ला देणार?’ असा प्रश्न विचारला असता, रोहितच्या मार्मिक उत्तराने तिथे उपस्थित असणाऱ्या सर्वांचेच चांगले मनोरंजन झाले.

पाकिस्तानी पत्रकाराने रोहित शर्माला, पाकिस्तानी फलंदाजांना काय सल्ला देणार असे विचारले असता, ‘आपण यदाकदाचित पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक बनलो तर मगच काय तो सल्ला देऊ शकू, त्याशिवाय आता काहीच बोलू शकत नाही’, असे उत्तर रोहित शर्माने देताच उपस्थित मंडळींमध्ये चांगलाच हशा पिकला. रोहितने सध्या सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेमध्ये दोन शतके आणि एक अर्धशतक झळकविले असून, या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणारा रोहित शर्मा, हा ऑस्ट्रेलियन संघाच्या अॅरन फिंच नंतर दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे.

Leave a Comment