असा होता मुमताज महलचा ताज महालापर्यंतचा अंतिम प्रवास.


ताज महाल ही सुंदर वास्तू केवळ ऐतिहासिक स्मारक नाही, तर शाहजहानच्या मनामध्ये आपल्या प्रिय पत्नी मुमताज महलसाठी असलेल्या प्रेमाचे प्रतीक म्हणून ही वास्तू जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. या वास्तूमध्ये मुमताज महलची समाधी असली, तरी वास्तविक मुमताज महलचे निधन या वास्तू पासून दूरवर असलेल्या मध्य प्रदेश राज्यातील बुऱ्हाणपूर या ठिकाणी झाले. बुऱ्हाणपूर आग्रापासून सुमारे नऊशे किलोमीटर अंतरावर आहे. शाहजहानच्या शासन काळामध्ये बुऱ्हाणपूर, खानदेश सुब्याची राजधानी असून, व्यापाराच्या दृष्टीने उत्तर भारत आणि दख्खन या प्रांतांना जोडणारे महत्वाचे केंद्र होते.

१६२९ साली खान जहान लोधी या बंडखोर सरदाराने अहमदनगरच्या निझामशाहशी हातमिळवणी करीत शाहजहानच्या शासनाविरुद्ध बंड पुकारले. हे बंड मोडून काढण्यासाठी शाहजहान मुमताज महलसह बुऱ्हाणपुरात दाखल झाले. त्याकाळी तेरावे बाळंतपण नुकतेच झाले असल्याने मुमताज महलची प्रकृती काहीशी नाजूकच होती. १७ जून १६३१ साली चौदाव्या वेळी गर्भारशी असताना, प्रसुतीच्या वेळी मुमताज महलचे निधन झाले. त्यावेळी तिचे वय चाळीस वर्षांचे होते. दुःखावेगाने सैरभैर झालेल्या शाहजहानने त्याचा मुलगा शाह शुजा याला मुमताज महलच्या समाधीसाठी योग्य ठिकाण शोधण्याची कामगिरी दिली.

मुमताज महलला झैनाबाद नामक बगिच्यामध्ये दफन करण्यात आले असले, तरी तिचे अवशेष बुऱ्हाणपुरामध्ये कायमस्वरूपी दफन न करता इतरत्र हलविले जावेत अशी शाहजहानची इच्छा असल्याने मुमताजचे अवशेष चांगल्या अवस्थेत टिकून राहवेत या साठी दफन करण्यापूर्वी मुमताज महलच्या मृतदेहाला खास उनानी औषधांचे लेप लावण्यात आले असल्याचे म्हटले जाते. १४ डिसेम्बर १६३१ साली मुमताज महलचे अवशेष झैनाबाद येथील समाधीतून काढून घेऊन आग्राच्या दिशेने मार्गस्थ झाले. तत्कालीन इतिहासकारांनी मुमताज महलच्या अंतिम यात्रेचे वर्णन आपल्या लेखनामध्ये करून ठेवले आहे.

या लेखकांनी केलेल्या वर्णनानुसार पंधरा वर्षीय शाह शुजा आणि हकीम वझीर खान यांच्यासमवेत हजारो सैनिक शाही ध्वज घेऊन चालत होते. मुमताज महलचे अवशेष एका सोन्याच्या शवपेटिकेमध्ये असून, ही अंतिम यात्रा पाहण्यासाठी शहरांमध्ये आणि गावांमध्ये दुतर्फा लोकांची भरपूर गर्दी झाली होती. या यात्रेमध्ये मुमताज महलच्या स्मरणार्थ गोर गरिबांना सोन्याच्या मोहरांचे दान करीत ही यात्रा आग्राच्या दिशेने सरकत होती. तब्बल नऊशे किलोमीटरचा प्रवास पार करून ही यात्रा पाच जानेवारी १६३२ रोजी आग्रा येथे पोहोचली.

आमेरचे राजे जयसिंह यांच्या यमुनेच्या तटानजीकच्या बगिच्यामध्ये मुमताज महलचे अवशेष असलेली शव पेटिका दफन करण्यात आली. या संदर्भात दोन निरनिरळ्या आख्यायिका ऐकावयास मिळतात. एका आख्यायिकेच्या अनुसार मुमताज महलचे अवशेष दफन करण्यात आल्यानंतर त्या समाधीच्या भोवती ताजमहाल बांधण्यात आला, तर दुसऱ्या आख्यायिकेच्या अनुसार बगिच्यामध्ये मुमताज महलचे अवशेष तात्पुरते दफन करण्यात आले असून, ताजमहालाची निर्मिती पूर्ण झाल्यानंतर मुमताज महलचे अवशेष बगीच्यातील समाधीमधून काढून ताजमहालामध्ये दफन करण्यात आले.

मुमताज महल अतिशय श्रीमंत राणी असून त्याकाळी तिच्या संग्रही कोट्यवधी रुपये मूल्याची संपत्ती होती.तिच्या मृत्युच्या पश्चात तिच्या इच्छेनुसार या संपत्तीपैकी दहा कोटी रुपये मूल्याची संपत्ती मुमताजने आपली कन्या जहान आरा हिच्या नावे केली असून, तिची उर्वरित संपत्ती तिच्या उर्वरित अपत्यांच्या नावे करण्यात आली. मुमताज महलच्या मृत्यनंतर शाहजहानच्या दुःखाचा आवेग इतका अधिक होता, की तिच्या आठवणींमध्ये सतत अश्रू ढाळल्याने त्याचे डोळे कमकुवत होऊ लागले असल्याचेही म्हटले जात असे. कालांतराने त्याची दृष्टी इतकी अंधुक झाली, की त्यासाठी त्याला चष्मा घालावा लागल्याची नोंदही इतिहासामध्ये सापडते. अशा रीतीने भारतीय इतिहासामध्ये चष्मा घालणारा शाहझान हा पहिला शासनकर्ता ठरला असे म्हणतात ! शाहजहानने आपल्या आयुष्याची अखेरची वर्षे आग्राच्या किल्ल्यामधे व्यतीत केली. औरंगझेबाने जबरदस्तीने सत्ता बळकविल्यानंतर शाहजहानला आग्राच्या किल्ल्यामध्ये बंदिस्त केले होते. तिथून मुमताज महलची समाधी असलेला ताजमहाल त्याला दूरवर दिसत राहील अशा ठिकाणी ठेवण्यात आले होते. १६६६ साली शाहजहानचे निधन झाल्यानंतर मुमताज महलच्या शेजारीच त्यालाही दफन करण्यात आले.

Leave a Comment