पुणे – यंदाच्या वर्षापासून इयत्ता दुसरीचा अभ्यासक्रम राज्य शिक्षण महामंडळाने बदलला आहे. सर्वात महत्वाचा बदल या नवीन अभ्यासक्रमात गणित विषयाच्या पुस्तकात करण्यात आला आहे. जोडाक्षरांची भीती मुलांना वाटू नये म्हणून यापुढे जोडाक्षरे वेगळ्या पद्धतीने वाचता येणार आहेत. पूर्वी १० अधिक १ अकरा असे बोलले जायचे, आता १० आणि १ असे सोप्या पद्धतीने बोलता येणार आहे.
इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात महत्वाचा बदल
तसेच १७ हा अंक असेल तर १७ सोबतच १० आणि ७, २८ सोबतच २० आणि ८, ७३ सोबतच ७० आणि ३ असा बदल करण्यात आला आहे. संख्या अशा पद्धतीने शिकवल्या जाणार आहेत. हीच पद्धत दक्षिणेकडच्या राज्यात प्रचलित आहे असा दाखला देण्यात आला आहे. हा बदल जेष्ठ गणितज्ञ मंगला जयंत नारळीकर यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यास मंडळाने सुचवला आणि नवीन पुस्तक छापून तो बालभारतीने अंमलात आणला आहे. पण हा निर्णय चुकीचा असल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडेल आणि व्यवहारात जोडाक्षरासहित आकडेमोड असल्याने ही मुले अडाणी ठरतील अशी भीती काही जणांकडून व्यक्त केली जात आहे.
तुम्ही साडेबारा, सव्वा पंचवीस या संख्याबाबत काय करणार असा प्रश्न ही उपस्थित केला जात आहे. विद्यार्थी आधीचीच प्रचलित पद्धत बालभारतीची पुस्तके न वापरणारे वापरणार असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण होईल त्यामुळे हा बदल अव्यवहार्य, अनावश्यक आहे असे मत व्यक्त केले जात आहे.