बेंगळूरूवासियांना घडले सूर्याभोवती इंद्रधनुच्या वलयाचे दर्शन !


अलीकडच्या काळामध्ये बेंगळूरू निवासींना एक आगळेच दृश्य आकाशामध्ये पहावयास मिळाले. अनेकांनी हे दृश्य आपापल्या मोबाईल फोन्सवर चित्रित केले असून, या दृश्याची छायाचित्रे आणि व्हिडीयोज सोशल मिडीयावर काहीच काळामध्ये व्हायरल झाले. असे दृश्य कशामुळे दिसले असावे, त्याचा नेमका काय अर्थ आहे, शास्त्रीय दृष्ट्या ही घटना महत्वाची आहे का, हे घटना पुढे घडणाऱ्या काही घटनांची पूर्वसूचना आहे का, असे अनेक प्रकारचे तर्कवितर्क सोशल मिडीयावर सुरु झाले, आणि जो तो या घटनेचा अर्थ लावण्याच्या प्रयत्नात गुंगला.

झाले असे, की बेंगळूरू निवासींनी आकाशामध्ये सूर्याच्या भोवती मोठे वलय पाहिले असून, या वलयामध्ये इंद्रधनुष्याचे रंग दिसत असल्याचे नागरिकांनी पाहिले. या दृश्याची अनेक छायाचित्रे सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. शास्त्रज्ञांच्या अनुसार या वलयाला ‘सन हेलो’ (sun halo) म्हणण्यात येत असून, याचा संबंध कोणत्याही प्रकारच्या शुभाशुभ घटनांशी, किंवा पॅरानॉर्मल गोष्टींशी नसून ही संपूर्णपणे वैज्ञानिक संकल्पना आहे.

वातावरणामध्ये असलेल्या बर्फाच्या कणांवरून सूर्यप्रकाश परावर्तित होत असल्याने त्याचे रूपांतर ‘प्रिझम इफेक्ट’ मधे होत असून, सूर्यापासून बरोबर बावीस अंशांच्या कोनावर अशा प्रकारचे वलय तयार होत असते. याच वलयाला वैज्ञानिक भाषेमध्ये ‘सन हेलो’ म्हटले जात असून, या वलयामध्ये इंद्रधनुचे रंग दृष्टीस पडतात. अशा प्रकारचे वलय दिसणे ही घटना दुर्मिळ असल्याने हे वलय दिसू लागता क्षणीच बेंगळूरू वासियांचे कुतूहल साहजिकच जागे झाले. पौराणिक कथांमध्ये देखील अशा प्रकारच्या वलयांचा उल्लेख असून, असे वलय दिसू लागताच जगबुडी येणार अशी समजूत असे. मात्र या समजुतीला कोणताही शास्त्रीय आधार नसून, सन हेलो ही संपूर्णपणे नैसर्गिक संकल्पना असल्याचे वैज्ञानिक म्हणतात.

Leave a Comment