ताज महाल दर्शनासाठी आतापासून समय सीमा लागू


जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेला ताज महाल पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. ताज महाल पाहण्यासाठी दरवर्षी भारतातूनच नाही तर विदेशातूनही लाखो पर्यटक आवर्जून येत असतात. युनेस्कोच्या वतीने ताज महालाला ‘वर्ल्ड हेरीटेज साईट’चा दर्जा देण्यात आला आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना ताज महाल आणि ताज महालचा संपूर्ण परिसर पाहण्यासाठी साधारण दीड ते दोन तासांचा अवधी लागतो. त्याशिवाय इतक्या सुंदर वास्तूची अगणित छायाचित्रे टिपण्याचा मोहही पर्यटकांना साहजिकच असतोच. त्यामुळे असंख्य पर्यटक ताज महालाच्या परिसरामध्ये अंमळ जास्तच वेळ रेंगाळतात. त्यामुळे ताज महालच्या परिसरामध्ये अनेकदा खूपच गर्दी होत असते. त्यामुळे वास्तूच्या आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही अधिक गंभीर होत चालला आहे.

मात्र आतापासून काही नवे नियम पर्यटकांसाठी लागू करण्यात येत असून, ताज महाल पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना ताज महालाचे दर्शन घेण्यासाठी तीन तासांची समय सीमा निश्चित करण्यात आली असून, तसे ‘टाईम स्लॉट’ पर्यटकांच्या प्रवेशपत्रकावर अंकित असणार आहेत. या ठराविक समय सीमेहून अधिक वेळ जर पर्यटकांनी ताज महाल दर्शनासाठी घालविला, तर त्यासाठी पर्यटकांना अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. ही नवी नियमावली अंमलात आणण्यासाठी आता ताज महालच्या प्रवेश व्यवस्थेत बदल करण्यात येऊन अनेक नवी ‘ऑटोमेटेड’ प्रवेशद्वारे उभी करण्यात आली आहेत. या प्रवेशद्वारांतून आत शिरताना प्रवेशपत्रकावर वेळेची नोंद केली जाणार आहे. तसेच ताज महालाचे दर्शन घेऊन बाहेर पडतानाही ‘ऑटोमेटेड एक्झिट गेट्स’ मधून पर्यटकांनी बाहेर पडायचे असून, त्यावेळी बाहेर पडण्याच्या वेळेची नोंद होणार आहे. आत शिरण्याच्या वेळेपासून तीन तासांच्या आत पर्यटक बाहेर पडले नसल्याचे दिसल्यास पर्यटकांना अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.

तीन तासांच्या पेक्षा जास्त वेळ ताज महाल दर्शासाठी घालविल्या बद्दल भरावयाचे अतिरिक्त शुल्क हे तिकिटाच्या मूळ किंमतीइतकेच असणार असून, हे अतिरिक्त शुल्क पर्यटकांना एक्झिट गेटवर भरावे लागणार आहे. तसेच ठराविक टाईम स्लॉटमध्ये पर्यटकांनी प्रवेश केला नाही, तर त्यापुढे त्यांना प्रवेश नाकारण्याची तरतूदही या नव्या नियमावलीमध्ये करण्यात आली आहे. अशा वेळी आधीचे तिकीट रद्द करून पर्यटकांना नवे तिकीट खरेदी करावे लागणार आहे. या नव्या नियमावलीमुळे ताज महाल पाहण्यासाठी पर्यटकांची होणारी तुफान गर्दी नियंत्रित करणे व्यवस्थापनाला शक्य होणार आहे.

अशा प्रकारची निवमावली लागू करणारे ताज महाल हे भारतातील एकमेव पर्यटनस्थळ असले, तरी जगभरामध्ये अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळी अशा प्रकारची नियमावली आधीपासूनच लागू आहे. रोममध्येही पर्यटकांसाठी नवी नियमावली अलीकडेच लागू झाली असून, त्याद्वारे चाके असलेल्या सूटकेसेस पर्यटनस्थळी आणण्यास पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे, तर स्पेनमध्ये काही ठिकाणी पुरुषांना विना शर्ट फिरण्यास कनाई करण्यात आली आहे.

Leave a Comment