अक्कल शून्य सरफराजवर भडकली रावळपिंडी एक्सप्रेस


रविवारी मँचेस्टरच्या मैदानात रंगलेला हायव्होल्टेज सामना भारताने पावसाच्या अडथळ्यामुळे डकवर्थ-लुइस पद्धतीने ८९ धावांनी जिंकला. भारताने या सामन्यातील विजयाबरोबर विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध अपराजित राहण्याची परंपरा कायम ठेवली आहे. सामन्यातील नाणेफेक वगळता सर्वच गोष्टी भारताच्या बाजूने घडत गेल्या आणि भारताचा विजय झाला. पाकिस्तानी कर्णधार सरफराज अहमद याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अनेक पाकिस्तानी चाहत्यांना त्याचा हा निर्णय फारसा रुचला नाही. सोशल मीडियावरुन त्यांनी तशी नाराजी व्यक्त केली आहे. सरफराजच्या या निर्णयावर रावळपिंडी एक्सप्रेस अर्थात शोएब अख्तर तर चांगला नाराज असून सरफराजला त्याने ‘अक्कल शून्य कर्णधार’ असे संबोधले आहे.

शोएबने आपल्या युट्यूब चॅनेलवर भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर या सामन्याचे विश्लेषण करणारा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. शोएबने ११ मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी संघावर ताशेरे ओढले असून त्याने या व्हिडीओत सरफराज आणि त्याच्या संपूर्ण सामन्यादरम्यान चुकलेल्या निर्णयांवर सडेतोड शब्दात टिका केली आहे.

एखादा कर्णधार एवढा अक्कल शून्य कसा असू शकतो, हेच मला कळत नाही. सरफराजला हे कळायला हवे होती की हा (पाकिस्तानी) संघ धावांचा पाठलाग करु शकत नाही. खेळपट्टी संपूर्ण सामन्यामध्ये कोरडीच होती ती ओली असण्याचा संबंधच नाही. सरफराजला ठाऊक आहे की पाकिस्तानची ताकद त्यांची गोलंदाजी असल्यामुळेच त्याने ही संधी महत्वपूर्ण नाणेफेक जिंकूनही वाया घालवली आणि पुन्हा एकदा त्याने आपण अक्कल शून्य असल्याचे दाखवून दिले, अशी टिका या व्हिडिओच्या माध्यमातून शोएबने केली आहे.

शोएबने कर्णधार सरफराजसोबतच संघ व्यवस्थापनावरही तोंडसुख घेतले आहे. मैदानावरील घडामोडींबद्दल पाकिस्तानी संघ व्यवस्थापन अनभिज्ञ होता. काही कल्पनाच आमच्या संघ व्यवस्थापनाला नव्हती. सरफराज अहमदचा संघ व्यवस्थापनासमोर पोपट झाला होता. सरफराजला नेतृत्व कसे करावे आणि निर्णय कसे घ्यावेत हे काहीच समजत नव्हते.

Leave a Comment