राहुल गांधी करतील का मोठी सर्जरी?


लोकसभा निवडणुकीच्या पराभवाच्या धक्क्यातून नुकत्याच सावरू लागलेल्या काँग्रेसमध्ये गोंधळाचे वातावरण पूर्णपणे दूर झालेले नाही. पक्षाच्या संघटनेत मोठे फेरबदल करण्याची गरज असल्याचे सूर अधूनमधून निघत असतात. ज्येष्ठ नेते आणि माजी कायदामंत्री वीरप्पा मोईली यांनी त्यात ताजी भर घातली आहे.

काँग्रेस पक्ष आणि संघटनेत मोठे फेरबदल करण्याची गरज आहे, असे मोईली म्हणाले आहेत. पक्षातील अंतर्गत वाद दूर करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पोलादी हाताने काम करावे आणि सर्व पातळ्यांवरील निवडणुका घ्याव्यात, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. मात्र राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबाबत त्यांनी अविश्वास व्यक्त केलेला नाही, हे येथे महत्त्वाचे. राहुल गांधी हेच फक्त पक्षाचे नेतृत्व करू शकतात आणि निवडणुकीतील काँग्रेसच्या दारुण पराभवासाठी काँग्रेस अध्यक्ष जबाबदार नाहीत, असे ते म्हणाले.

सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला अत्यंत नामुष्कीकारक पराभवाला सामोरे जावे लागले आणि गेल्या वेळेस पेक्षा पक्षाच्या केवळ आठ जागा वाढल्या. त्याची नैतिक जबाबदारी घेऊन राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ केला होता मात्र त्यांनी आपल्या पदावर कायम राहावे, यासाठी पक्षाच्या सर्व नेत्यांनी विनंती केली होती. राहुल यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे 2017 मध्ये हाती घेतली होती आणि त्यांना आणखी वेळ मिळायला हवा, असा पक्षातील सूर आहे. शिवाय झारखंड, महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यातील निवडणुका तोंडावर आहेत. आताच पक्षात काही बदल केले तर या निवडणुकांवर त्यांचा परिणाम होऊ शकतो, असेही पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

मात्र मोईली यांनी पक्षात मोठी शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे. पक्षात नवे रक्त यायला हवे आणि हे सर्व राहुल गांधीच करू शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे.

कुठल्याही पक्षाच्या दृष्टीने हार आणि जीत या गोष्टी सहज असतात. आज दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भाजपलाही 2004 मध्य अशाच पराभवाला सामोरे जावे लागले होते आणि 10 वर्षे सत्तेबाहेर राहावे लागले होते. मात्र पक्षात माजलेली बेदिली ही काँग्रेसच्या दृष्टीने खरी समस्या ठरली आहे. राजस्थान, पंजाब आणि तेलंगाणा राज्यात काँग्रेसमध्ये आंतरिक कलह उफाळला आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्या गटांमध्ये वाद उफाळला असून तेथे पराभवाची जबाबदारी घ्यायला दोन्ही नेत्यांनी नकार दिला आहे. पंजाबमध्ये काँग्रेसची कामगिरी उत्तम झाली तरीही तेथे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि मंत्री नवज्योसिंह सिद्धू यांच्यातून विॊस्तव जात नाही. एक तर मी तरी राहीन किंवा सिद्धू तरी असा निर्वाणीचा इशारा तिथे कॅप्टन अमरिंदर यांनी राहुलना दिला आहे.

कर्नाटकात कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला पाठिंबा देऊन काँग्रेसने भाजपवर मात केली खरी, मात्र पहिल्या दिवसापासून तेथे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न झाले. काँग्रेस आणि जेडीएसमधील मतभेद वेळोवेळी समोर आले आहेत. तेथे सिद्धरामय्या यांची महत्त्वाकांक्षा कोणत्याही क्षणी सरकारसाठी काळ बनू शकते. शिवाय रोशन बेग यांच्यासारखे काँग्रेस नेते तेथे मुस्लिमांनी भाजपसोबत जावे असे सांगून पक्षाला अडचणीत आणत आहेत. तेलंगाणात काँग्रेसच्या 12 आमदारांनी राजीनामा देऊन सत्ताधारी तेलंगाणा राष्ट्र समितीशी घरोबा केला आहे. त्यामुळे पक्षाला मुख्य विरोधी पक्षाचे स्थानही गमवावे लागले आणि आता तो तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे.गुजरातेत आमदार अल्पेश ठाकोर यांनी राजीनामा दिला आहे. तेथे एक डझनापेक्षा जास्त आमदार काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाऊ शकतात असे ठाकोर यांचे म्हणणे आहे.

त्यामुळे मोईली म्हणतात तसे काँग्रेसला खरोखरच मोठ्या शस्त्रक्रियेची गरज आहे. राहुल यांना अशा सर्व घरभेद्यांना आवरावे लागेल. लोकसभा निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस अस्तित्वासाठी झगडत आहे. अशा परिस्थितीत राहुल यांना आपली ‘सज्जन’ नेत्याची प्रतिमा बाजूला ठेवून कठोर भूमिका घ्यावीच लागल. इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे जेव्हा हातात घेतली तेव्हा बहुतांश काँग्रेस नेते त्यांच्या विरोधात कारवाया करत होते. तेव्हा इंदिराजींनी असेच कर्तव्यकठोर होऊन काँग्रेसचे विभाजन केले आणि 1969 साली नवीन पक्ष स्थापन केला. त्या घटनेला 50 वर्ष पूर्ण होत असताना राहुल गांधी यांना त्या घटनेची आठवण करायला हवी. इंदिराजींनी केलेली तेव्हाची ती शस्त्रक्रियाच होती आणि आताही राहुल गांधींना शस्त्रक्रियाच करावी लागेल. दुसरा पर्यायच काँग्रेससमोर नाही.

Leave a Comment