मधमाशांची मानवासाठी किंमत 40,000 अब्ज रुपये!


मधमाशी आणि मनु्ष्यांचा रस्ता एकमेकांपासून वेगळा आहे. मनुष्य मधमाशांच्या मार्गात येतो, मधाचे पोळे पळवितो किंवा अजाणता मधमाशांना छेडतो तेव्हा या मधमाशा आपला खरा रंग दाखवतात. त्यामुळे मधमाशी आपल्याला शत्रू वाटते. परंतु आपल्या मनुष्यांचे जग सही सलामत चालण्यात मधमाशांचा मोठा वाटा आहे.

एक ग्रॅमपेक्षाही कमी वजन असलेली मधमाशी पृथ्वीवरील 70 पेक्षा जास्त शेतीपिकांचे परागसिंचन करते. त्यामुळे मधमाशांची संख्या घटली तर जगातील शेतीचे उत्पादनही खाली येईल. संपूर्ण जगातील अन्न-पाण्याचा हिशेब ठेवणाऱ्या ‘फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गेनायझेशन’ (एफएओ) या संस्थेच्या अंदाजापनुसार, जगभरातील आहार उत्पादनात मधमाशांचा वाटा 577 अब्ज डॉलर म्हणजेच 40,000 अब्ज रुपये एवढा आहे. त्यांचे हे महत्त्व ओळखूनच संयुक्त राष्ट्रसंघाने 20 डिसेंबर 2017 रोजी एक ठराव मंजूर करून 20 मे हा दिवस ‘जागतिक मधमाशी दिन’ म्हणून जाहीर केला.

आपल्याला जी सामान्य डंख मारणारी माशी वाटते, त्या माशीच्या आधारे खरे तर जगातील अनेक पिके, शेती, अर्थव्यवस्था आणि आपल्या अन्न-पाण्याचा निभाव होतो. मधमाशांचे काम मध आणि नैसर्गिक मेण उत्पादन करण्याचे आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मात्र ही मधमाशांचा साईड बिझिनेस आहे. त्यांचे खरे कारण तर परागसिंचन हे आहे. त्यामुळे मधमाशींचे अस्तित्व टिकून राहणे हे मानवाच्या भवितव्यासाठी महत्त्वाचे आहे.

मधमाशांची संख्या घटली तर किमान 70प्रकारच्या पिकांचे उत्पादन कमी होऊ शकते. वाईट म्हणजे मधमाशींप्रमाणेच परागसिंचन करू शकणाऱ्या दुसऱ्या किटकांची संख्याही कमी होत आहे. शिवाय मधमाशांनी परागसिंचन केलेल्या पिकांची गुणवत्ता अधिक उत्तम असल्याचे शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून दिसून आले आहे. उदाहरणार्थ, स्ट्रॉबेरीच्या पिकांचा शास्त्रज्ञांनी अभ्यास केला तेव्हा मधमाशीच्या साहाय्याने पिकलेल्या फळांचा दर्जा उत्तम असल्यामुळे 39 टक्के जास्त किंमत मिळाल्याचे आढळले.

मात्र एफएओच्या म्हणण्यानुसार, मधमाशांची संख्या सातत्याने घटत आहे. भरीव शारीरिक आकार असलेल्या वन्य जीवांची संख्या कमी झाली तर लगेच जाणवते. त्यामुळे सेव्ह टायगर किंवा सेव्ह एलिफंट अशा मोहिमा राबविल्या जातात. परंतु मधमाशी मुळातच इवलीशी! त्यांची संख्या कमी झाली तरी ते कोणाच्या लक्षात कशी येणार? मात्र शेकडो किंवा हजारो किंवा लाखो मधमाशा कमी झाल्या तर त्या नक्कीच लक्षात येतात. शिवाय त्यांच्या अनुपस्थितीमुळे परिणाम होणाऱ्या शेतीमुळे तर त्यांची उणीव नक्कीच भासते. सध्या हीच परिस्थिती आली आहे.

ही परिस्थिती लक्षात घेऊन आता मधमाशी पालन केंद्रांची संख्या वाढत आहे. तसेच मधमाशा भाड्याने देण्याचा व्यवसायही खूप वाढला आहे. हा व्यवसाय आधी अमेरिका-युरोपात सुरू झाला आणि तो भारतातही काही प्रमाणात पसरला आहे. ज्या पिकांचे परागसिंचन करायचे आहे त्या पिकांच्या शेतीत शेडमध्ये मधमाशांचे खोके लावण्यात येते. काही मधमाशापालकांनी आपल्या ट्रक-वाहनालाच मधमाशीच्या राहण्यासाठी योग्य असे बदलले आहे. ज्या शेतात मधमाशीची गरज असते तेथे हे वाहन नेऊन उभे करण्यात येते. एका अंदाजाप्रमाणे जगात अशा प्रकारचे 8 कोटी 10 लाख पोळे आहेत.

तरीही मधमाशांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, ही वस्तुस्थिती काही बदलत नाही. खासकरून अमेरिकेसारख्या देशात गेली दीड-दोन दशके ही समस्या भेडसावत आहे. त्यामुळे 12 वर्षांपूर्वी अमेरिकेच्या सीनेटने एकमताने एक ठराव मंजूर करून जूनचा एक आठवडा “नॅशनल पोलिनेटर वीक” साजरा करण्याचे ठरविले. सध्या हा आठवडा साजरा करण्यात येत आहे.

शेतात मोठ्या प्रमाणात फवारलेले कीटकनाशक आणि रसायने ही मधमाशांची लोकसंख्या कमी होण्याचे मुख्य कारण आहे. त्याच प्रमाणे उष्ण हवामान मधमाशांना मानवत नाही आणि जागतिक तपमानवाढीमुळे जगात सर्वत्र उष्णता वाढत नाही. मधमाशांच्या वसतीला लायक वने आणि वृक्षही आता कमी होत आहेत.

खरे तर निसर्गातील छोट्यातील छोटा जीवही आपल्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. ते्व्हा एवढीशी ती मधमाशी, तिचे काय कौतुक असे म्हणून तिच्या नाशाकडे दुर्लक्ष होता कामा नये. ती आपली पहिली अन्नदाती आहे, हे विसरता कामा नये.

Leave a Comment