हिंदुत्वाला उत्तर सॉफ्ट नव्हे, सुपर हिंदुत्व!


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी 2014 आणि नंतर 2019 मध्ये मिळविलेल्या प्रचंड यशामागे त्यांची हिंदुत्ववादी ही प्रतिमा असल्याचे सर्वच तज्ञांचे मत आहे. त्यांच्या या प्रतिमेला शह देण्यासाठी आपल्यालाही हिंदुत्वाची कास धरावी लागेल, असे काँग्रेसमधील काही मंडळींचे मत आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ हे या मंडळींचे अग्रणी आहेत. त्यांनी आपल्या राज्यात भाजपच्या अजेंड्यावरील सर्व विषय बेमालूम पळविले असून भाजपच्या हिंदुत्वाला सुपर हिंदुत्वाने उत्तर दिले आहे.

कमलनाथ यांनी राज्यात प्रोजेक्ट गोशाळा नावाची एक योजनाच सुरू केली असून त्यातून गायपालनाला प्रोत्साहन दिले जात आहे. ज्या व्यक्तीला गोशाळा उघडण्याची इच्छा आहे, त्याला सरकारी जमिनीचा वापर करण्याचे अधिकार दिले जावेत, अशा सूचना त्यांनी नुकत्याच दिल्या. प्रोजेक्ट गोशाळाच्या कामांना वेग द्यावा आणि त्यांची मुदत निश्चित करून कोणती गोशाळा कधी सुरू होईल, याची माहिती मला द्यावी, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. गाईच्या संरक्षणासाठी एक आंदोलन उभे करावे आणि त्यात अधिकाधिक लोकांना जोडावे, असे त्यांनी सांगितले. मध्य प्रदेशात 614 गोशाळांना सरकारकडून अनुदान मिळते. मात्र मागील सरकारने एकही गोशाळा उघडली नाही, अशी टीका करायलाही ते विसरले नाहीत.

तसे पाहायला गेले, तर मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच काँग्रेसने हिंदुत्व आणि गाईचे विषय काढण्यास सुरूवात केली होती. काँग्रेसने आपल्या जाहिरनाम्यात गाईबाबत अनेक वायदे केले होते. त्यांचा पक्षाला फायदाही झाला आणि 15 वर्षांनंतर काँग्रेसला सत्तेत पुनरागमन करण्याची संधी मिळाली. आता कमलनाथ यांना याचे श्रेय द्यायला हवे की निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने ते पूर्ण करत आहेत. हिंदुत्व आणि गाय हे दोन्ही भारतीय जनता पक्षाचे जिव्हाळ्याचे विषय आहेत आणि भाजपच्याच शस्त्राने भाजपला गारद करण्याची कमलनाथ यांची योजना आहे. मात्र यात त्यांनी भाजपच्या एक पाऊल पुढे मजल मारली आहे.

उदाहरणार्थ गोहत्येसाठी राष्ट्रीय सुरक्षा कायदा (रासुका) लागू करणे. रासुका हा अत्यंत कठोर कायदा असून त्याची तुलना देशद्रोहाच्या कायद्याशी करण्यात येते. या कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला आरोप न ठेवताही 15 दिवस कोठडीत बंद करता येते. तसेच अटकेचे कारण दिल्यानंतर त्या व्यक्तीला एक वर्ष कोठडीत ठेवता येते. राज्यातील खंडवा जिल्ह्यातील तीन आरोपींच्या विरोधात गोहत्येच्या आरोपावरून रासुका लावण्यात आला होता. आतापर्यंत उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांचा अपवाद वगळता भाजपशासित राज्यांमध्येही अशा प्रकारचा आरोप ठेवण्यात आला नव्हता.

याशिवाय कमलनाथ यांनी एकानंतर एक असे अनेक काम केले ज्यामुळे हिंदू मतपेढी आकर्षित व्हावी. वर गोशाळेचा उल्लेख आला आहेच. याशिवाय राज्यात पहिल्यांदाच सरकारी पातळीवर पुजाऱ्यांच्या नियुक्तीसाठी नियम बनवण्यात आले आहेत. यानुसार वंश परंपरा आणि गुरु-शिष्य परंपरेला पुजाऱ्यांच्या भरतीत प्राथमिकता देण्यात येईल. तसेच पुजाऱ्याने शुद्ध शाकाहारी असणे आवश्यक आहे.

या वर्षीच्या सुरूवातीलाच सरकारने पुजाऱ्यांचे मानधन वाढविण्याचीही घोषणा केली. पूर्वीच्या सरकारच्या तुलनेत पुजाऱ्यांना आता तिप्पट मानधन देण्यात येत आहे. पूर्वीत हे मानधन 1000 रुपये होते आणि आता 3000 रुपये देण्यात येते. इतकेच नव्हे, तर कमलनाथ यांनी आणखी पुढे जात हिंदुत्व कार्ड चालवले आणि 12 फेब्रुवारीपासून राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना कुंभमेळ्याची यात्रा घडविली. त्यासाठी खास रेल्वेची व्यवस्था करण्यात आली. ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ असे या योजनेचे नाव आहे.

कमलनाथ यांच्याच राज्यातील दिग्विजय सिंह यांनीही हाच मार्ग चोखाळला असून त्यांनी आपल्या निवडणुकीसाठी कॉम्प्युटर बाबा नावाच्या साधूला सोबत घेतले होते. मात्र त्याचा त्यांना फायदा झाला नाही आणि साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

त्याही पूर्वी हिंदुत्ववाची प्रयोगशाळा म्हणून ओळख असलेल्या गुजरातमध्ये राहुल गांधींनी सॉफ्ट हिंदुत्वाचा मार्ग धरला होता. त्यांनी विविध मंदिरांना भेट देऊन मतदारांना आपलेसे प्रयत्न केला. द्वारकाधीश मंदिर, चौटिला मंदिर, खोडियार माता मंदिर अशा अनेक मंदिराच्या पायऱ्या त्यांनी झिजवल्या. त्याचा काही प्रमाणात राहुल गांधींना फायदा झाला आणि गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय थोडक्यात हुकला. त्यामुळे येत्या काळात काँग्रेसचा हा हिंदुत्वज्वर आणखी वाढत गेल्यास नवल नाही.

Leave a Comment