अमित शहांसह सर्वच राजकीय नेत्यांकडून टीम इंडियाचे कौतुक


नवी दिल्ली – भारताने विश्वचषक स्पर्धेतील हाय व्होल्टेज सामन्यात पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर विजयी टीम इंडियाचे देशभरातून कौतुक केले जात आहे. दरम्यान टीम इंडियाच्या या विजयाची तुलना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय सैन्यदलाने केलेल्या २०१६ च्या सर्जिकल स्ट्राईकशी केली आहे.

टीम इंडियाने प्रतिष्ठेच्या सामन्यात पाकिस्तानला नमविल्याने देशातील विविध राजकीय नेत्यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. आपल्या ट्विटमध्ये अमित शहा यांनी म्हटले, आणखी एक सर्जिक स्ट्राईक टीम इंडियाने केला आहे. त्याचा परिणाम सारखाच आहे. उत्कृष्ट कामगिरीबद्दल संपूर्ण संघाचे अभिनंदन. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी टीम इंडियाचा आम्हा सर्वांना अभिमान वाटतो, असे ट्विटमध्ये म्हटले आहे. भारताने विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरोधात विजय संपादन केल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन. भारतीय क्रिकेट संघ हा विलक्षणरित्या खेळल्याचे त्यांनी कौतुक केले आहे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) किरेन रिजीजू यांनी ट्विट करताना म्हटले , वेल डन बॉय्ज, अभिनंदन! पाकिस्तान हरणार आणि भारताचा मोठा विजय होईल, हे आधीच म्हटले होते.

रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी ट्विटमध्ये आणखी एक विजय मिळविल्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन, असे म्हटले आहे. आपला संघ हा प्रतिष्ठित असा विश्वचषक आणेल, अशी इच्छा आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा! दरम्यान भारतीय संघाचे जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या पक्षाध्यक्षा महेबुबा मुफ्ती यांनी देखील अभिनंदन केले आहे. चांगली कामगिरी आणि भारताचा अभिमान उंचावल्याबद्दल त्यांनी संघाचे अभिनंदन केले. पाकिस्तानचा पराभव झाला. पण त्यांनी पराभव न स्विकारल्याने स्वत:वर विनोद करत ट्विटवर मनोरंजन केले, असा त्यांनी पाकिस्तानला चिमटा काढला.

भारतीय संघ छान खेळला. रोमहर्षक विजयाबद्दल अभिनंदन. जय हिंद, असे नितीन गडकरी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. भारतीय संघाचे काँग्रेस पक्षानेही अभिनंदन केले. पाकिस्तावर अतुलनीय विजय मिळविल्याबद्दल अभिनंदन. तुम्ही सातत्याने भारताचा अभिमान उंचावला. धन्यवाद! असे काँग्रेस पक्षाने ट्विट केले.

यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये, काय खेळलात! खूप अभिमान आहे! महत्त्वाचा विजय मिळविल्याबद्दल अभिनंदन, असे म्हटले आहे.

Leave a Comment