असे आहे अंदमानचे ‘सेल्युलर जेल’


स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काही स्वातंत्र्य सैनिकांचे प्रभावी विचार जनमानसापर्यंत पोहोचण्यापासून रोखणे ब्रिटीश राजवटीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे ठरत होते. त्यामुळे त्यांना जनमानसापासून दूर ठेवत अतोनात यातना देऊन त्यांचे मानसिक आणि शारीरिक खच्चीकारण करण्याच्या एकमेव उद्देशाने अंदमान येथे सेल्युलर जेलची निर्मिती करण्यात आली. हे कारागृह अन्दमान निकोबार राज्याची राजधानी पोर्ट ब्लेअर येथे बनविण्यात आले असून, स्वातंत्र्य सैनिक या कारागृहामध्ये भोगत असलेल्या शिक्षेला ‘काळ्या पाण्याची शिक्षा’

(सजा ए कालापानी) म्हटले जात असे. १८५७च्या बंडानंतरच अशा प्रकारच्या कारागृहाच्या निर्माणाचा विचार तत्कालीन ब्रिटीश शासनाच्या मनामध्ये घोळू लागला होता. मात्र प्रत्यक्षात ६९६ कोठड्या असलेल्या या कारागृहाच्या निर्माणाला १८९६ साली सुरुवात झाली.

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या इच्छेने पेटून उठलेल्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांना रोखण्यासाठी ब्रिटीश सरकारने सर्व शक्य ते मार्ग स्वीकारले. अशा स्वातंत्र्य सैनिकांच्या विचारांनी प्रभावित होऊन सामान्य जनतादेखील स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सहभागी होताना पाहिल्यानंतर या स्वातंत्र्य सैनिकांना जनमानसापासून लांब ठेवणे अपरिहार्य होऊन बसले. या स्वातंत्र्य सैनिकांचा प्रभाव जनमानसावर असल्याने केवळ त्यांना तुरुंगामध्ये डांबून ठेवणे पुरेसे नसून, त्यांचा भारताच्या जनतेशी असलेला संपर्क संपूर्णपणे तोडून टाकण्याच्या उद्देशाने सेल्युलर जेलची निर्मिती केली गेली. त्यामुळे १८९६ साली पोर्ट ब्लेअर येथे या कारागृहाच्या निर्मितीची सुरुवात करण्यात येऊन हे कारागृह १९०६ साली तयार झाले.

भारताच्या मुख्य भूमीपासून अनेक कोसांच्या अंतरावर असलेल्या या कारागृहाच्या आसपास केवळ अथांग समुद्र होता. त्यामुळे या कारागृहातून निसटून पळून जाणे, येथे बंदिवान असलेल्या कैद्यांसाठी केवळ अशक्य होते. या कारागृहामध्ये प्रत्येकी तीन मजली अशा सात शाखा बनविण्यात आल्या. या सर्व शाखांमध्ये मिळून एकूण ६९६ कोठड्या क्रांतिकारी कैद्यांसाठी तयार करण्यात आल्या. यातील प्रत्येक कोठडीचा आकार ४.५/२.७ मीटर इतका असून, या कोठड्यांमध्ये खिडक्याही बनविण्यात आल्या होत्या. या कारगृहाच्या निर्माणासाठी त्या काळी पाच लाख सतरा हजार रुपये खर्च करण्यात आले असून, या कारागृहाच्या निर्माणासाठी खास बर्माहून मागविल्या गेलेल्या लाल रंगाच्या विटा वापरण्यात आल्या. कारागृहाच्या सात शाखांच्या बरोबर मध्यभागी एक वॉच टॉवर बनविण्यात येऊन यामध्ये एक मोठी घंटा लावण्यात आली. क्रांतिकारी कैद्यांवर नजर ठेवण्याचे काम या वॉच टॉवरमधून केले जात असे, व कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवल्यास ही भली मोठी घंटा वाजवून धोक्याची सूचना सर्व पहारेकरी सैनिकांना दिली जात असे.

या कारागृहातील कोठड्यांमध्ये राहणाऱ्या क्रांतिकारी कैद्यांचा आपसात कोणत्याही प्रकारे संपर्क येऊ नये याची पूर्ण दक्षता घेतली जात असे. स्वातंत्र्य चळवळीशी निगडित कोणतीही गुप्त योजना कैद्यांना बनविता येऊ नये हा त्यामागील उद्देश होता. तसेच या क्रांतिकारी कैद्यांना एकांतवासामध्ये राहावे लागत असल्याने त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचाही त्यामध्ये उद्देश होताच. या कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांवर अमानुष अत्याचार केले जात असत. दररोज तेलाच्या घाण्याला जुंपून तेल काढण्याचे काम या कैद्यांना करावे लागत असे. प्रत्येक कैद्याला दररोज तीस पाउंड नारळाचे आणि मोहोरीचे तेल घाण्यावरून काढावे लागत असे. जे क्रांतिकारी कैदी ही शिक्षा पूर्ण करू शकत नसत, त्यांना जबर मारहाण केली जात असे. अशा प्रकारचे खडतर जीवन या कारागृहातील कैद्यांना व्यतीत करावे लागत असे.

सेल्युलर जेलमध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. यामध्ये बटुकेश्वर दत्त, विनायक दामोदर सावरकर, बाबुराव सावरकर, सोहन सिंह, मौलाना अहमदुल्ला, इत्यादी मुख्य नावे आहेत. सेल्युलर जेलच्या भिंतींवर, येथे कारावासामध्ये शहीद झालेल्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांची कोरलेली नावे आजही पहावयास मिळतात. तसेच त्याकाळी या कैद्यांवर क्रूर अत्याचार करण्यासाठी वापरण्यात येणारी अवजारे आज येथे येणाऱ्या पर्यटकांना पाहता येण्याची मुभा असून, ही अवजारे पाहून या क्रांतीकाऱ्यांचे जीवन किती हालाखीचे असेल याची कल्पना आपल्याला येते.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या कारागृहाच्या चार शाखा नष्ट करण्यात येऊन आता केवळ तीन शाखा शिल्लक आहेत. या तीन शाखा आणि मध्यभागी असलेला वॉच टॉवर अशा संपूर्ण वास्तूला १९६९ साली ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करण्यात आले. सध्याच्या काळामध्ये या तीन शाखांचे रूपांतर मोठ्या सरकारी रुग्णालयामध्ये करण्यात आले असून, या रुग्णालयामध्ये पाचशे बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. चाळीस डॉक्टर्सची टीम या रुग्णालयामध्ये रुग्णांच्या सेवेसाठी सिद्ध आहे. २००६ साली सेल्युलर जेलच्या निर्मितीला शंभर वर्षे पूर्ण झाली असून त्यावेळी झालेल्या समारंभामध्ये येथे कारावास भोगलेल्या सर्व दिवंगत क्रांतिकारी कैद्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली होती.

Leave a Comment