लघवीतून रक्त पडत असल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला आवश्यक


लघवीतून रक्त पडणे ही समस्या पुरुषांच्या बाबतीत काहीशी सामान्य समस्या असली, तरी त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित वैद्यकीय उपचारांची आवश्यकता आहे. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (युटीआय) हे लघवीवाटे रक्त जाण्यामागचे प्रमुख कारण असले, तरी याशिवाय अन्य काही कारणांमुळेही ही समस्या उद्भवू शकते. युटीआय, मूत्रमार्गामध्ये जीवाणूंच्या संक्रमणामुळे उद्भवणारी समस्या आहे. वारंवार लघवीची भावना होणे, मूत्रमार्गामध्ये जळजळ, आणि वेदना ही युटीआयची सामान्य लक्षणे आहेत. त्याचबरोबर लघवीला येत असलेली अति दुर्गंधी आणि कंबरदुखी ही देखील युटीआयची लक्षणे आहेत. ही लक्षणे जाणविल्यास त्यांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

किडनी स्टोन असल्यासही लघवीतून रक्त पडण्याची समस्या उद्भवू शकते. या लक्षणांच्या जोडीने लघवीला येणारी तीव्र दुर्गंधी आणि पोटदुखी ही लक्षणे देखील जाणवू शकतात. उलट्या होणे, कंबरदुखी ही लक्षणे जाणविण्याची शक्यता असून, त्यासोबत लघवीवाटे रक्त पडत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन किडनी स्टोन आहे किंवा नाही याचे निदान करून घेणे अगत्याचे ठरते. शरीरातील रक्त ‘फिल्टर’ करण्याचे काम किडनी करीत असून, किडनीच्या कार्यामध्ये बिघाड झाला, किंवा काही कारणाने किडनीला इजा झाली असल्यासही किडनीचे कार्य बिघडून लघवीवाटे रक्त पडू शकते. तसेच प्रोस्टेट ग्रंथीची अवाजवी वाढ झाली असल्यासही लघवीवाटे रक्त पडण्याची शक्यता असते. प्रोस्टेट ग्रंथी मूत्राशयाच्या खाली आणि मलाशायाच्या समोरच्या बाजूला असते. प्रजननासाठी वीर्य निर्माण करण्याचे काम ही ग्रंथी करीत असते. जर या ग्रंथीमध्ये वाढ झाली, तर वेदना होण्यासोबतच लघवीवाटे रक्त पडू लागते. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.

अनेकदा अतिव्यायाम करणे, किंवा अति शारीरिक श्रमांनी किंवा ज्यांच्या शरीरामध्ये पाण्याची सतत कमतरता असते, त्यांनाही लघवीवाटे रक्त पडण्याची समस्या उद्भवू शकते. त्याचप्रमाणे अनेकदा काही आजारांच्या उपचार स्वरूप घेण्यात आलेल्या औषधांच्या साईड इफेक्ट्स मुळेही लघवीवाटे रक्त पडण्याची समस्या उद्भवते. कारण कोणतेही असो, जर लघवीवाटे रक्त पडत असले, तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करणे आवश्यक असते. तसेच यासाठी स्वतःच्या मनाने औषधे न घेता डॉक्टरांकडे जाऊन समस्येमागच्या कारणाचे निदान केल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच उपचार केले जाणे आवश्यक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment