घरामध्ये प्रदूषणाचे परिणाम टाळण्यासाठी लावा ही झाडे


प्रदूषणाची समस्या आजकाल जवळजवळ प्रत्येक लहान मोठ्या शहरांमध्ये, गावांमध्ये भेडसावू लागली आहे. या प्रदूषणामुळे अनेक तऱ्हेचे विकार, आणि संक्रमणे, अॅलर्जी, श्वसनरोग, डोळ्यांशी किंवा त्वचेशी निगडित अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत. अशा वेळी घरामध्ये लावल्या जाणाऱ्या काही झाडांमुळे घरातील प्रदूषित हवा शुद्ध होण्यास मदत होत असते. ही झाडे घराच्या आतमध्ये लावता येण्यासारखी असून, त्यांची निगा राखणेही फारसे अवघड नसते. केवळ वेळोवेळी पाणी देणे आणि ठराविक काळानंतर या झाडांना सूर्यप्रकाश मिळत राहील हे पाहणे, इतकीच निगा या झाडांसाठी आवश्यक असते.

‘एरेका पाम’ हे झाड घरामध्ये लावल्याने घरातील दूषित हवा शुद्ध होण्यास मदत होते. या झाडाला जास्त निगेची आवश्यकता नसून, दररोज पाणी घातले जाणे आणि वेळोवेळी वाळलेल्या फांद्या काढून टाकणे अशा निगेची आवश्यकता असते. हे झाड शक्यतो मोठ्या कुंडीमध्ये लावावे. त्यामुळे या झाडाची वाढ चांगली होते. ‘पीस लिली’ हे झाडही घराच्या आतमध्ये लावता येण्यासारखे असून, हे झाड दिसावयासही अतिशय नाजूक आणि सुंदर दिसते. या झाडामुळेही दूषित हवा स्वच्छ होण्यास मदत होते.

‘गोल्डन पोथोस’ हे झाड मनी प्लांट प्रमाणेच दिसते. हे झाड मनी प्लांटच्या अनेक प्रजातींपैकी एक असून, या झाडाला सूर्यप्रकाशाची फारशी आवश्यकता नसल्याने हे झाड घराच्या आतमध्ये लावण्यासाठी एकदम योग्य आहे. घरातील दूषित हवा स्वच्छ करण्यासाठी ‘बोस्टन फर्न’ ही अतिशय उत्तम असून, याची पाने ही अतिशय नाजूक आणि सुंदर दिसतात. ‘लेडी पाम’ हे झाड घरातील दूषित हवा आणि त्याचबरोबर घरातील दमटपणाही दूर करणारे आहे.

अॅलो व्हेरा, किंवा कोरफड ही केवळ आपल्या केसांसाठी किंवा त्वचेसाठी उपयुक्त नसून, दूषित हवा शुद्ध करण्यासाठीही अतिशय उत्तम समजली जाते. कोरफडीला जास्त पाण्याची अथवा थेट सूर्यप्रकाशाची आवश्यकता नाही. हे झाड ओलसर मातीमध्ये चांगले वाढते.
या झाडांप्रमाणेच हार्ट लीफ, डंब केन, बांबू प्लांट, फिलोडेंड्रोन, ड्वार्फ डेट पाम, स्नेक प्लांट, द्रासिना प्लांट, इत्यादी सर्व झाडे घराला शोभा आणणारी आहेतच, पण त्याशिवाय घरातील दूषित हवा शुद्ध करणारीही आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment