हे आहेत बॉलीवूडमधील सर्वात चर्चिले गेलेले घटस्फोट


ज्याप्रमाणे दोन सुप्रसिद्ध बॉलीवूड कलाकारांचे विवाह नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात, त्याचप्रमाणे काही बॉलीवूड दाम्पत्यांचे झालेले घटस्फोटही चर्चेचे विषय ठरले आहेत. यामध्ये प्रामुख्याने नाव येते ते म्हणजे अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांचे. विवाहाला बारा वर्षे उलटून गेल्यानंतर या दाम्पत्याने अखेरीस वैचारिक मतभेदांमुळे २००४ साली घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोट झाल्यानंतर सैफ अली खानने अमृता सिंहला सात कोटी रुपये रक्कम पोटगी म्हणून दिली. अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझॅन खान यांचा घटस्फोट काहीसा अनपेक्षित म्हणावा लागेल. हृतिकची सिनेसृष्टीतील कारकीर्द सुरु होण्यापूर्वीपासूनच हे दांपत्य एकत्र होते. हृतिकचा पहिला चित्रपट ‘कहो ना प्यार है’ प्रचंड यशस्वी झाल्यानंतर या दाम्पत्याने विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चौदा वर्षांच्या कालावधीनंतर या दाम्पत्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या घटस्फोटानंतर सुझॅनने पोटगी म्हणून चारशे कोटी रुपयांची मागणी केली असल्याने हा घटस्फोट काही काळ तरी मोठ्या चर्चेचा विषय ठरला होता.

‘परफेक्शनिस्ट’ म्हणून बॉलीवूडमध्ये लौकिक असणारा अभिनेता आमीर खान आणि त्याची पत्नी रीना दत्ता यांचा विवाह १९८६ साली झाला. त्याकाळी आमीरच्या सिनेसृष्टीतील यशस्वी कारकिर्दीला नुकती कुठे सुरुवात होत होती. २००२ साली या दाम्पत्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या घटस्फोटानंतर रीनाने आमीरकडे पोटगीदाखल पन्नास कोटी रुपयांची मागणी केली होती. एके काळी आपला समर्थ अभिनय आणि उत्तम नृत्य कौशल्य यांनी दर्शकांवर जादू केलेली अभिनेत्री करिष्मा कपूर हिचा विवाह २००३ साली उद्योगपती संजय कपूरशी झाला. या विवाहसंबंधांमध्ये सुरुवातीपासूनच तणाव होते. त्यानंतर जेव्हा या दाम्पत्याचे वादविवाद विकोपाला गेले तेव्हा त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. २०१५ साली हे दाम्पत्य अखेर वेगळे झाले. या घटस्फोटानंतर करिश्माला सात कोटी रुपये पोटगीदाखल मिळाले असल्याचे समजते.

Leave a Comment