असे होते एके काळी लोकप्रिय असलेले ‘व्हिक्टोरियन टेपवर्म डाएट’

Tapeworm-Diet
सडपातळ राहण्यासाठी, वजन नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी आहारनियम किंवा डायटची नित्य नवी रूपे आपण पाहत असतो, त्यांच्याबद्दल वाचत, किंवा ऐकत ही असतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डायट सांभाळणे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असले तरी या प्रक्रियेला वेळ देण्याची आवश्यकता असते. पण काहींना वजन कमी करण्याची इतकी घाई असते, की त्यापायी अश्या व्यक्ती आपण होऊन, कोणाच्या सल्ल्याविना स्वतःच्या मनाने स्वतःवर निरनिराळे प्रयोग करून पाहण्यासही मागेपुढे बघत नाहीत. पण डायटचे असे प्रयोग केवळ आजच्या काळामध्ये नाही, तर अठराव्या शतकामध्येही अस्तित्वात होते. स्वतःला सडपातळ, सुंदर ठेवण्यासाठी स्त्रिया किती पराकोटीचे प्रयत्न करीत असत, याचे उदाहरण म्हणजे त्याकाळी लोकप्रिय असलेले ‘टेप वर्म डायट’.

अठराव्या शतकाच्या काळामध्ये युरोपीय देशांमध्ये, स्त्रियांसाठी त्यांचे सौदर्य ही महत्वाची बाब समजली जात असे. हे सौंदर्य मिळविण्यासाठी स्वतःवर जीवघेणे प्रयोग करून पाहण्याची पद्धतही सर्वमान्य असे. अगदी अमोनियाचे सेवन करण्यापासून ते स्नानासाठी आर्सेनिक वापरण्यापर्यंत निरनिराळे प्रयोग त्याकाळी प्रचलित होते. यामध्ये अगदी आजच्या काळामध्ये अभावानेच का होईना, पण पहावयास मिळणारे टेपवर्म डायटही समाविष्ट आहे. या डायटच्या पद्धतीनुसार ‘टेपवर्म’ नामक जंतूची अंडी असलेली एक गोळी घ्यावी लागे. ही अंडी आतड्यांमध्ये जाऊन कालांतराने त्यातून टेपवर्म बाहेर येत असत. त्या व्यक्तीने सेवन केलेले कोणतेही अन्न या आतड्यांतील टेपवर्म फस्त करीत असत. त्यामुळे खाल्लेले अन्न अंगी न लागता वजन भराभर घटण्यास सुरुवात होत असे. त्यामुळे कॅलरीजची किंवा वजन वाढण्याची चिंता न करता हवे तितके आणि हवे ते खाल्ल्यानंतरही वजन वाढत नसे.
Tapeworm-Diet1
सौंदर्य मिळविणे आणि मिळालेले सौंदर्य टिकवून ठेवणे ही मोठी जिकिरीची गोष्ट असून, त्यासाठी थोडी मेहनत आणि धोका पत्करणे योग्यच असल्याचा समज तत्कालीन स्त्रियांमध्ये रूढ होता. आजच्या काळामध्येही काही स्त्रियांनी टेपवर्म डायटचा अवलंब करून स्वतःचा जीव धोक्यात घातल्याच्या काही घटना पहावयास मिळत असतात. मात्र हे डायट अतिशय धोकादायक असून, यामुळे विनासायास वजन घटत असले, तरी याचे अतिशय भयंकर दुष्परिणाम थोड्याच अवधीमध्ये पहावयास मिळतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment