निद्रिस्त ज्वालामुखीच्या आठशे फुट खोल विवरामध्ये पडलेल्या इसमाची सुखरूप सुटका


अमेरिकेतील ओरेगॉन राज्यामध्ये स्थित निद्रिस्त ज्वालामुखीमुळे तयार झालेल्या आठशे फुट खोल विवरामध्ये अपघाताने पडलेल्या एका इसमाची सुखरूप सुटका करण्यात अमेरिकन कोस्ट गार्डच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे. ओरेगॉन येथील रीम्स व्हिलेज या गावापासून जवळच असलेल्या क्रेटर लेक नॅशनल पार्क येथून, हा मनुष्य आठशे फूट खोल विवरामध्ये पडला असल्याची सूचना कोस्ट गार्डला देण्यात आली. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने कोस्ट गार्डचे कर्मचारी या विवराशी पोहोचेपर्यंत या मनुष्याला विवरातून बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरु झाले असून, दोरखंडाच्या सहाय्याने बचाव दलाचे काही कर्मचारी या विवरामध्ये उतरू लागले होते.

या मनुष्याला बाहेर काढण्यासाठी बचाव दलाचे कर्मचारी या मनुष्यापर्यंत पोहोचले असता, हा मनुष्य जखमी अवस्थेत आढळला. त्यांनतर हेलिकॉप्टरमधून सोडलेल्या दोऱ्यांच्या सहाय्याने या मनुष्याला बाहेर काढण्यात कर्मचाऱ्यांना यश आले. हे हेलिकॉप्टर या जखमी मनुष्यासहित जवळच असलेल्या सार्वजनिक कार पार्किंग मध्ये उतरले. त्याठिकाणी रुग्णवाहिका आधीच बोलाविली गेली असल्याने त्या मनुष्याची रवानगी रुग्णवाहिकेतून बेंड शहरातील रुग्णालयात करण्यात आली.

या आठशे फुट खोल विवरामध्ये पडलेल्या इसमाची ओळख गुप्त ठेवण्यात आली असून, त्याला या अपघातामध्ये झालेल्या इजेचा वृत्तांतही प्रसिद्ध केला गेला नसला, तरी इस्पितळामध्ये उपचारांच्या नंतर हा इसम थोडाफार चालू शकण्याच्या परिस्थितीमधे असल्याने त्याला झालेली इजा फारशी गंभीर नसावी असे म्हटले जात आहे. हा इसम या खोल विवरामध्ये पडला कसा, हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Leave a Comment