भाविकांचे मनोरथ पूर्ण करणारे ‘कैंची धाम’


भारतामध्ये अनेक पावन क्षेत्रे अशी आहेत, जिथे दर्शनास गेल्याने सर्व मनोरथ पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा असते. असेच एक पावन क्षेत्र देवभूमी उत्तराखंड येथे असून, या क्षेत्राला ‘कैंची धाम’ या नावाने ओळखण्यात येते. कैंची धाम हे मंदिर नीम करौली बाबा या संतांनी स्थापिले असून, हे संत श्री हनुमानाचे अवतार असल्याचे म्हटले जाते. नैनिताल पासून काही किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या कैंची धामाविषयी भाविकांच्या मनामध्ये अपार श्रद्धा आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाचे मनोरथ करौली बाबांच्या आशिर्वादाने पूर्ण होत असल्याची भाविकांची मान्यता आहे. म्हणूनच या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी केवळ देशभरातूनच नाही, तर विदेशातूनही अनेक भाविक येत असतात.

या मंदिरामध्ये भाविक संपूर्ण वर्षभरामध्ये कधीही दर्शनाला येऊ शकत असले, तरी दर वर्षी पंधरा जून या दिवशी मंदिरामध्ये मेळाव्याचे आणि अन्नछत्राचे आयोजन केले जाते. हा दिवस मंदिराचा स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येत असून, बाबा नीम करौली यांनी १९६४ साली, याच दिवशी हनुमान मंदिराची स्थापना केली होती. १९६१ साली बाबा करौली या ठिकाणी सर्वप्रथम आले. त्यांनतर त्यांचे स्नेही पूर्णानंद यांच्या सहाय्याने येथे आश्रमाची स्थापना करण्याचा निर्णय करौली बाबांनी घेतला. करौली बाबा हनुमानाचे कडवे उपासक असून, हनुमानाच्या कृपेनेच त्यांना अनेक दिव्य सिद्धी प्राप्त असल्याचे म्हटले जात असे. अनेक भाविक त्यांना हनुमानाचा अवतार मानीत असत. मात्र करौली बाबांना पूजा-अर्चांचे अवडंबर अजिबात पसंत नव्हते. त्यामुळेच सर्वसामान्य मनुष्याप्रमाणे जीवन व्यतीत करणारे करौली बाबा भाविकांना चरणस्पर्शही करू देत नसत. त्यांच्या माथी ना कुठला टिळा असे, ना त्यांच्या गळ्यामध्ये कसल्या माळा. त्यांचे चरणस्पर्श करू इच्छिणाऱ्या भाविकांना ते हनुमानाचे चरण स्पर्श करण्यास सांगत असत.

करौली बाबांनी स्थापित केलेल्या कैंची आश्रमात हनुमानाचे मंदिर आहे. तसेच या मंदिराच्या नजीक असलेल्या गुफेमध्ये करौली बाबा जप-तप, ध्यानधारणा करीत असल्याने ही गुफाही भाविकांसाठी पवित्र स्थान मानली गेली आहे. १९७३ साली करौली बाबांनी समाधी घेतल्यानंतर पुढे तीन वर्षे असंख्य कारागिरांच्या मेहनतीच्या फलस्वरूप कैंची धाम उभे राहिले, आणि १५ जून १९७६ साली बाबा करौली यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना या मंदिरामध्ये करण्यात आली.

Leave a Comment