शारदा पीठ – जाणून घेऊ या काही रोचक तथ्ये.


शारदा पीठ पाकिस्तान अधिकृत काश्मीर क्षेत्रातील अतिशय प्राचीन आणि सांस्कृतिक स्थळ आहे. हे पीठ काश्मिरी पंडितांसाठी अतिशय महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या तीन प्रसिद्ध धर्मस्थळांपैकी एक आहे. यातील अन्य दोन पवित्र स्थाने अनंतनाग येथील मार्तंड सूर्यमंदिर आणि अमरनाथ मंदिर आहेत. शारदा मठ हे मंदिर सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीचे असून, या मंदिराशी निगडीत अनेक मान्यता आहेत. काही मान्यतांच्या अनुसार सम्राट अशोकाच्या शासनकाळामध्ये, शारदा पीठाची स्थापना ख्रिस्तपूर्व २३७ साली झाली होती. विद्येची अधिष्ठात्री शारदा हिला समर्पित हे पीठ अध्ययनाचे प्राचीन केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. काही मान्यतांच्या अनुसार या मंदिराचे निर्माण पहिल्या शतकाच्या सुरुवातीला कुषाणांच्या शासनाच्या वेळी झाले असल्याचे म्हटले जाते.

शारदा मंदिर मुजफ्फराबाद पासून सुमारे १४० किलोमीटर अंतरावर असून, कुपवाडा पासून सुमारे तीस किलोमीटरच्या अंतरावर पाकिस्तान अधिकृत काश्मीर (पीओके) मधील नियंत्रण रेखेच्या (एलओसी) जवळ असलेल्या नीलम नदीच्या तटावर आहे. काही प्राचीन वृत्तांताच्या अनुसार मंदिराची उंची १४२ फूट असून, रुंदी ९४.६ फुट आहे. मंदिराच्या बाहेरील भिंती सहा फुट रुंद आणि अकरा फुट लांब आहेत. या मंदिराचे वृत्त खंड आठ फुट उंचीचे असून, यातील बहुतेक भागाची पडझड झाली आहे. या मंदिराला शक्ती पीठ मानले जात असून, देवी सतीच्या शरीराचे काही भाग येथे असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे हे मंदिर अठरा महाशक्तीपीठांपैकी एक मानले जाते.

शारदा पीठ हे विद्येचे प्राचीन केंद्र असून, पाणिनी आणि अन्य व्याकरण तज्ञांनी व धर्मशास्त्रज्ञांनी लिहिलेले अनेक ग्रंथ येथे संग्रहित होते. त्यामुळे हे क्षेत्र भाषिक, वैदिक आणि धार्मिक शास्त्रांच्या उच्च अध्ययनाचे मुख्य केंद्र मानले जात असे. प्राचीन काळी भारतातील सर्वात मोठे पुस्तकालय या ठिकाणी अस्तित्वात असून, त्या काळी सुमारे पाच हजार विद्वान येथे शिक्षणासाठी राहिले असल्याचे म्हटले जाते. १९४७ झालेल्या फाळणीनंतर हे मंदिर आता देखभालीच्या अभावी अगदी ओसाड पडून आहे. त्यानंतर या मंदिरामध्ये दर्शनासाठी येण्यास भाविकांना बंदी करण्यात आल्यानंतर या मंदिराची मोठी वाताहत झाली आहे.

Leave a Comment