जाणून घेऊन महाभारतातील कपटी शकुनी मामाबद्दल काही रोचक तथ्ये


महाभारतातील सर्वात कपटी, कारस्थानी व्यक्ती म्हणून आपल्याला शकुनी परिचित आहे. गांधार देशाचा राजपुत्र आणि गांधारीचा सख्खा भाऊ असलेला शकुनी, महाभारताचे युद्ध घडवून आणण्यासाठी जबाबदार असेलल्या व्यक्तींपैकी एक समजला जातो. शकुनीने दुर्योधनाचे कान भरून त्याच्या मनामध्ये पांडवांच्या विरुद्ध सतत विष कालविले, त्यामुळेच अखेरीस एकाच परिवारातील भावा-भावांचे हे वंशज एकमेकांच्या विरुद्ध युद्धामध्ये उभे ठाकले, ही कथा आपल्या सर्वांच्या चांगली परिचयाची असली, तरी कपटी शकुनीच्या खासगी आयुष्याविषयी फारशी माहिती कोणाला नाही. शकुनीच्या कपटी स्वभावाबद्दल आपल्याला त्याचा तिरस्कार वाटत असला, तरी केवळ द्यूताच्या बळावर पांडवांचे सर्व राज्य जिंकून घेण्याची शक्ती आणि बुद्धी केवळ त्याचाकडेच होती, हे वास्तवही आपल्याला नाकारता येत नाही. अश्या ह्या शकुनी बद्दल काही रोचक ऐतिहासिक तथ्ये, आपण जाणून घेऊ या.

महाराणी गांधारी ही विष्णूभक्त असली, तरी तिचा सख्खा भाऊ असलेला शकुनी मात्र कट्टर शिवभक्त होता. त्याला उलुका आणि विक्रासुर नावाचे दोन मुलगे होते. उलुकाने शकुनीला हस्तिनापुर सोडून गांधार देशाला परतण्याची अनेकदा विनंती केली, पण शकुनी मात्र हट्टाने हस्तिनापुरातच मुक्काम करून राहिला. जेव्हा भीष्माने गांधार देशावर आक्रमण केले होते, तेव्हाच त्याचा आणि त्याच्या कुरु वंशाचा नायनाट करण्याची प्रतिज्ञा शकुनीने कली होती. त्यामुळे त्याची प्रतिज्ञा पूर्ण होईपर्यंत तो हस्तिनापुर सोडायला तयार नव्हता.

शकुनी हा, राजा सुबालाचा शंभरावा पुत्र होता. त्यामुळे शकुनीला कौरवांच्या रूपात केवळ शंभर भाचेच नव्हते, तर त्याला स्वतःला ही नव्व्याण्णव भाऊ होते. शकुनी सर्वात धाकटा आणि सर्वात बुद्धिमान म्हणून ओळखला जात असे. आश्चर्याची गोष्ट ही की भीष्माचा संपूर्ण नायनाट करण्याची प्रतिज्ञा घेतलेल्या शकुनीच्या मनामध्ये पांडवांच्या बद्दल फारसा आकस नव्हता. पण भीष्माने गांधार देशाचे युद्धामध्ये मोठे नुकसान करून गांधारीचा विवाह दृष्टिहीन असलेल्या धृतराष्ट्रासोबत लावल्याचा राग शकुनीच्या मनामध्ये कायम होता. त्याचा बदला म्हणून शकुनीने भीष्माचा आणि त्याच्या संपूर्ण वंशाचा नायनाट करण्याची प्रतिज्ञा केली.

महाभारतामध्ये खेळल्या गेलेल्या द्यूताच्या डावाचे मोठे महत्व आहे. शकुनी द्युतामध्ये निपुण होता. शकुनीचे द्युतामध्ये वापरण्याचे फासे त्याच्या वडिलांच्या मांडीचा हाडांपासून बनविले गेले असल्याची आख्यायिका प्रसिद्ध असली, तर वास्तवात मात्र हे फासे हस्तिदंती असल्याचा उल्लेख सापडतो. महाभारताचे युद्ध सुरु झाल्याच्या अठराव्या दिवशी, भरसभेत द्रौपदीच्या झालेल्या अपमानाचा बदला घेत, सहदेवाने शकुनीला ठार मारले. केरळमध्ये शकुनीला समर्पित मंदिर असून, हे मंदिर पवित्रेश्वरम ह्या नावाने ओळखले जाते. केरळ मधील कोल्लम जिल्ह्यातील कुरुवर जमातीद्वारे ह्या मंदिराचे व्यवस्थापन पाहिले जाते.

Leave a Comment