या मंदिरामध्ये चिठ्ठी लिहून भाविक करतात मनोरथ पूर्ण होण्याची प्रार्थना.


ऋग्वेदामध्ये उत्तराखंडच्या भूमीचे वर्णन देवभूमी असे केले गेले आहे. या भूमीवर देवदेवता निवास करतात अशी भाविकांची मान्यता असून, हिमालयाच्या कुशीमध्ये वसलेल्या या पावन क्षेत्रामध्ये अनेक देव देवतांची प्रार्थनास्थळे आहेत. या मंदिरांची कीर्ती भारतात नाही, तर विदेशांमध्येही आहे. त्यातीलच एक मंदिर आहे, ‘गोलू देवता मंदिर’. या मंदिरातील देवतेला स्थानीय मान्यतांच्या अनुसार ‘न्याय देवता’ म्हणूनही संबोधले जाते. उत्तराखंडमध्ये गोलू देवतेची अनेक मंदिरे असून त्या सर्वांमध्ये अल्मोडा येथे असलेले ‘चितई गोलू देवता मंदिर’ हे सर्वाधिक लोकप्रिय आहे. या मंदिराच्या परिसरामध्ये भाविकांची नेहमी गर्दी पहावयास मिळत असते.

स्थानीय संस्कृतीमध्ये सर्वात महत्वपूर्ण आणि त्वरित न्यायनिवाडा करणारे देवता म्हणून ‘गोलू देवता’ची ख्याती असून, या देवतेला ‘गौर भैरव’ या नावानेही संबोधले जाते. गोलू देवता भगवान शंकरांचे अवतार मानले जातात. येथे येणारे भाविक आपले मनोरथ पूर्ण होण्यासाठी गोलू देवतेला नवस बोलतात आणि मनोकामना पूर्ण झाल्यानंतर गोलू देवतेच्या दर्शनाला येऊन मंदिरामध्ये एक लहानशी घंटा बांधतात. ही परंपरा गेली अनेक दशके येथे सुरु आहे.

या मंदिरामध्ये भाविक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवाला गाऱ्हाणे घालण्यासाठी येत असून, आपले मनोरथ एका चिठ्ठीवर लिहून ही चिठ्ठी मंदिरामध्ये असलेल्या अनेक घंटांपैकी एकावर बांधली जाते. इतकेच नव्हे एखादी मनोकामना पूर्ण व्हायलाच हवी असा जर एखाद्या भाविकाचा आग्रहच असेल, तर ते आपली मनोकामना साध्या कागदावर न लिहिता चक्क स्टँप पेपरवर लिहून देवाच्या मंदिरामध्ये अर्पण केला जाण्याची परंपरा येथे आहे ! घरामध्ये सुरु असलेले पारिवारिक वाद, मतभेद याबाबतीतही न्यायनिवाडा करण्याची प्रार्थनाही या चिठ्ठ्यांमध्ये असते. आपल्या या प्रार्थना देवापर्यंत पोहोचून देवच न्याय करेल ही भाविकंची अढळ श्रद्धा असते. त्यामुळे या मंदिरामध्ये असलेल्या असंख्य घंटांवर असंख्य चिठ्ठ्या पहावयास मिळतात.

चितई गोलू मंदिर या नावाने प्रसिद्ध असलेले हे देवस्थान अल्मोडापासून आठ किलोमीटर अंतरावर पिठोरागढ हायवे नजीक आहे. या मंदिरामध्ये सफेद अश्वावर आरूढ असणारी सफेद पगडी धारण केलेली गोलू देवतेची मूर्ती आहे. गोलू देवतेच्या हाती धनुष्यबाण असून, हे धनुष्यबाण न्यायचे प्रतीक आहेत. हे मंदिर राजधानी दिल्ली पासून चारशे किलोमीटरच्या अंतरावर असून, येथे दर्शनाला यायचे असल्यास दिल्लीतील आनंद विहार या ठीकणाहून अल्मोडासाठी थेट बससेवा उपलब्ध आहे. अन्यथा दिल्लीहून हलद्वानी येथे जाऊन इथून अल्मोडा साठी बससेवा उपलब्ध आहे.

Leave a Comment