मृत्यू पश्चात अंत्यविधींच्या अशाही अजब परंपरा


हिंदू धर्माच्या अनुसार एखाद्या व्यक्तीच्या पश्चात त्या व्यक्तीचे दहनविधी करण्यात येतात, तर इस्लाम आणि इसाई धर्मामध्ये मृत व्यक्तीला जमिनीमध्ये दफन करण्याची पद्धत रूढ आहे. मात्र काही ठिकाणच्या अंत्यविधींच्या परंपरा काहीशा अजबच म्हणायला हव्यात. काही ठिकाणी मृत व्यक्तीचे शव गिधाडांना खाऊ घातले जाण्याची परंपरा आहे. आपल्याला हे वाचून आश्चर्य वाटत असले, तरी त्या ठिकाणी ही परंपरा गेल्या अनेक दशकांपासून अस्तित्वात आहे.

चीन आणि फिलिपिन्स या देशांच्या काही भागांमध्ये मृत व्यक्तीचे शव ताबुतामध्ये ठेऊन हे ताबूत उंच पहाडांवर लटकविले जातात. असे केल्याने मृत व्यक्तीच्या आत्म्याला स्वर्गप्राप्ती होत असल्याची मान्यता या ठिकाणी रूढ आहे. इंडोनेशियातील बाली प्रांतामध्ये मृत व्यक्तीला मृत न मानता, ती व्यक्ती केवळ निद्राधीन आहे असे मानले जाते. त्यामुळे येथे एखादी व्यक्ती मृत झाल्यास ती व्यक्ती केवळ निद्रिस्त आहे असे समजून त्या व्यक्तीसाठी शोक न करण्याची परंपरा येथे रूढ आहे. दक्षिण मेक्सिकोतील मायन भागातील रहिवाश्यांमध्ये कोणाचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीचे शव घराच्या परिसरामधेच दफन करण्याची परंपरा आहे. असे केल्याने आपली प्रिय व्यक्ती सदैव आपल्या जवळच रहात असल्याची येथील रहिवाश्यांची मान्यता आहे.

व्हीयेतनाम मध्ये काही ठिकाणी रूढ असलेल्या परंपरेच्या अनुसार मृत व्यक्तीचे शव निर्वस्त्र करून उघड्यावर ठेवले जाते. असे केल्याने त्या मृत व्यक्तीचा आत्मा त्याच्या देहामध्ये पुनश्च प्रवेश करीत असल्याची मान्यता येथे रूढ आहे. तिबेट येथील बौद्ध धर्मीयांमध्ये मृत व्यक्तीच्या शरीराचे लहान लहान तुकडे करून हे तुकडे गिधाडांना खाऊ घालण्याची पद्धत आहे. ही परंपरा गेली अनेक शतके अस्तित्वात असून, याला ‘नियिंगमा’ ( स्काय बरियल) या नावाने ओळखले जाते. मृत व्यक्तीचे शरीर गिधाडांनी खाल्ले, तर गिधाडांनी उड्डाण करताच मृत व्यक्तीचा आत्माही त्यांच्यासोबत उड्डाण करून स्वर्गामध्ये पोहोचत असल्याची मान्यता येथे रूढ आहे.

Leave a Comment