शिर्डीच्या साईबाबा मंदिरातून नाणी घेण्यास बँकांनी का दिला नकार?


शिर्डी येथील श्री साईबाबांच्या मंदिरामध्ये बाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी केवळ भारतातूनच नाही, तर परदेशांमधूनही असंख्य भाविक येत असतात. वर्षभरामध्ये येथे दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या लाखोंमध्ये आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. दर्शनासाठी मंदिरामध्ये येणारे भाविक मंदिराच्या दानपेटीमध्ये आपापल्या कुवतीनुसार धनदान करीत असतात. पण अलीकडे मात्र साईबाबांच्या मंदिरातील दानपेटीमध्ये जमा झालेली नाणी घेण्यास बँकांनी नकार दिला आहे.

बँक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार इतक्या मोठ्या प्रमाणावर साठलेली नाणी ठेवण्याइतकी जागाच बँकांमध्ये उपलब्ध नाही. अलीकडच्या काळामध्ये साईबाबा संस्थानाकडे सुमारे दीड कोटी रुपये मूल्याची नाणी जमा असून, ही धनराशी बँकांमध्ये जमा केली जाण्याच्या प्रतीक्षेत आहे. मात्र इतकी सर्व नाणी ठेवण्याची जागाच बँकांमध्ये उपलब्ध नसल्याने बँक अधिकारी आणि मंदिराचे व्यवस्थापन यांच्यापुढे मोठाच पेच उभा राहिला आहे. त्यामुळे साईबाबा संस्थान ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि इतर राष्ट्रीयीकृत बँकांना पत्र लिहून या समस्येवर तोडगा काढण्याची विनंती केली आहे. दररोज देश-विदेशातून हजारोंच्या संख्येने भाविक या मंदिरामध्ये साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी येत असतात.

या मंदिरामध्ये येणारी दानाची रक्कम पाहता, तिरुपती बालाजी मंदिरानंतर याच मंदिरामध्ये सर्वाधिक दानाची रक्कम गोळा होत असल्याचे म्हटले जाते. दान म्हणून भाविक पैशांच्या नोटा किंवा नाणी दानपेटीमध्ये अर्पण करीत असतात. साईबाबा मंदिरामध्ये दर मंगळवारी आणि शुक्रवारी दान म्हणून आलेल्या रकमेची मोजणी केली जात असून, ही रक्कम आळीपाळीने आठ राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये जमा केली जात असते. साईबाबा संस्थानाकडे एकाच आठवड्यात दानरूपात येणारी रक्कम चार ते पाच कोटींच्या घरात असून, यामध्ये सात ते दहा लाखांची रक्कम नाण्यांच्या रूपात असते. ही सर्व रक्कम बँकांमध्ये जशीच्या तशी जमा केली जात असून, गेल्या काही महिन्यांपासून बँकांमध्ये नाण्यांची भांडारे साठल्यामुळे आता अतिरिक्त नाणी जमा करून घेण्यासाठी असमर्थता बँकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्या हातात असलेली दीड कोटी मूल्याची नाणी कुठे ठेवली जावीत हा साईबाबा संस्थानापुढला मोठा प्रश्न होऊन बसला आहे.

Leave a Comment