राज्याचे उपमुख्यमंत्री बनणार आदित्य ठाकरे?


मुंबई – राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला उपमुख्यमंत्री पद येणार असून शिवसेनेच्या काही नेत्यांनी युवासनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. पण या पदासाठी आदित्य हे तयार नसल्यास एकनाथ शिंदे इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी आदित्य ठाकरे हे राज्याचे उपमुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. तसेच आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री व्हावे, अशी मागणी शिवसैनिकांमधून होत आहे. पण या पदासाठी आदित्य हे तयार नसल्यास शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. उपमुख्यमंत्रीपदी ठाकरे घराण्याच्या जवळचे असलेले सुभाष देसाई यांना बसविण्याला सेनेच्याच आमदारांचा विरोध असल्यामुळे आदित्य यांच्या वाढदिवशी शिंदे यांनी ३२ आमदारांना घेऊन शक्ती प्रदर्शनही केले होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी युती सरकार सत्तेत असताना कोणतेही पद स्विकारले नव्हते. तसेच सेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीदेखील प्रत्यक्ष पद न स्विकारता सत्तेचा रिमोट कंट्रोल केवळ हातात ठेवला असल्यामुळे आदित्य ठाकरे हे उपमुख्यमंत्री झाल्यास ते ठाकरे घराण्यातील पहिले मंत्री ठरणार आहेत. अशा राजकीय पार्श्वभूमीवर शिवसेनेत कोणत्या नेत्याला मंत्रीपद मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Comment