तुमचे जीवन हॅकरच्या हाती – धडा बाल्टिमोरचा


सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात माणूस पूर्णपणे यंत्रावलंबी बनला आहे. खासकरून संगणक आणि इंटरनेटशिवायच्या आयुष्याची कल्पनाही आता सहन होत नाही. मात्र याच इंटरनेटमुळे एक नवा धोका निर्माण झाला आहे आणि तो आहे हॅकिंगचा. कुठल्याही संगणक यंत्रणेत प्रवेश करू शकणारे हॅकर आपल्या संपूर्ण आयुष्याचा ताबा घेऊ शकतात, असा इशारा अनेक तज्ञांनी वारंवार दिला आहे. मात्र आतापर्यंत कागदावरच असलेला हा इशारा प्रत्यक्षात उतरला आहे एका अमेरिकी शहरात. त्यापासून धडा घेणे हेच सध्या आपल्या हातात आहे.

अमेरिकेतील मेरीलँड राज्यातील बाल्टिमोर हे शहर सध्या हॅकर्सच्या ताब्यात आहे. या हॅकरची ताकद आणि व्याप सतत वाढत आहे. सर्वात आधी त्यांनी बाल्टिमोरच्या तातडीच्या सेवा (इमर्जन्सी सर्व्हिसेस) हॅक केल्या. त्यानंतर आता त्यांनी संपूर्ण प्रशासन हॅक केले असून ते सुरळीत करण्यासाठी खंडणीची मागणी केली आहे. अशा प्रकारे हॅकरच्या सावटाखाली जगण्याचा बाल्टिमोरवासियांचा हा पाचवा आठवडा आहे. लोकांना इमारती परवाने आणि व्यवसाय परवाने मिळत नाहीत किंवा घरांची खरेदी – विक्री करता येत नाहीये.

बाल्टिमोर शहराची लोकसंख्या जेमतेम 10 लाख एवढी आहे, मात्र या सर्व नागरिकांची माहिती आता हॅकरच्या तावडीत आहे. पहिला हल्ला झाला तेव्हा अमेरिकेच्या सायबर तज्ञांची एक फौज कामाला लावून तो हल्ला परतवून लावण्यात आला. मात्र या तज्ञांचे यश अगदी तात्पुरते ठरले. कारण लगेचच दुसऱ्या दिवशी पुन्हा हॅकरनी संपूर्ण यंत्रणा आपल्या हातात घेतली. आज स्थिती अशी आहे, की अख्खे बाल्टिमोर शहर हॅकरच्या तालावर आहे.

या हॅकरची मागणी काय आहे? तर त्यांनी सरकारकडे 13 बिटकॉईनची (76,280 डॉलर) मागणी केली आहे. गंमत म्हणजे सरकारची ही खंडणी द्यायला तयारी आहे, मात्र त्या बदल्यात हॅकरनी बाल्टिमोरकडे पुन्हा आपला मोर्चा वळवू नये, ही सरकारची मागणी आहे. त्याला हे हॅकर तयार नाहीत. हॅकरच्या दृष्टीने 76,280 डॉलरची रक्कम ही एका वेळेसची नाही तर दर महिन्याची खंडणी आहे. शिवाय हे पैसे दिले तरी या संगणकांतील सर्व फाईल्स परत मिळतील, याची कोणतीही हमी नाही. कारण अशा प्रकारच्या बहुतेक सायबर हल्ल्यांमध्ये हल्लेखोर खंडणी दिली किंवा न दिली तरी डेटा नष्ट करतात.

अमेरिकेसारख्या सामर्थ्यशाली देशात अशा प्रकारे हॅकर सरकारला वेठीस धरू शकतील, ही गोष्ट सहजासहजी गळी उतरण्यासारखी नाही. परंतु वास्तव हे कल्पनेपेक्षा जास्त विचित्र असते म्हणतात तशीच ही वस्तुस्थिती आहे. जर बाल्टिमोरच्या प्रशासनाने पुन्ही ही यंत्रणा नव्याने उभी करण्याचे ठरविले तर त्यासाठी 1 कोटी 80 लाख डॉलर एवढा खर्च येणार आहे.

दरम्यान, सरकारी कार्यालयांतील संगणक बंद पडल्यामुळे कामेही ठप्प झाली आहेत. आमच्या शहरातील कामे तंत्रज्ञानाच्या आधारे होतात, हे आतापर्यंत बाल्टिमोरवासी अभिमानाने सांगत असत. मात्र आता तेथे पुन्हा हाताने काम करण्याची मागणी होत आहे.

अलीकडच्या वर्षांत अशा प्रकारचे अनेक हल्ले अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनमधील राष्ट्रीय आरोग्य सेवा तसेच स्थानिक काऊंटी आणि राज्य सरकारांना झाले असून त्यांनी या प्रशासनाला विकलांग केले आहे. अशा प्रकारे खंडणी मिळेपर्यंत संगणक यंत्रणा बंद पाडणाऱ्या हल्ल्यांना रॅन्समवेअर म्हणून ओळखले जाते. अमेरिकेतील अनेक स्थानिक सरकारांना रॅन्समवेअरच्या वाढत्या धोक्याचा सामना करावा लागत आहे. इतका की, “रॅन्समवेअर ही अमेरिकेतील एक महामारी आहे,” असे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या सायबर विभागातील विशेष एजंट जोएल डीकापुआ यांनी वॉल स्ट्रीट जर्नल या प्रख्यात वृत्तपत्राला सांगितले. पाच वर्षापूर्वी बहुतेक रॅन्समवेअर हल्ले घरगुती संगणकांवर हल्ले करत असत, आता ते थेट सरकारपर्यंत आले आहेत.

थोडक्यात म्हणजे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कारभार करत असताना जनतेची सुरक्षितता व त्यांच्या मालमत्तेचे रक्षण करणे ही सरकारसाठी प्रचंड मोठी जबाबदारी ठरत आहे. इंटरनेटच्या अधिकाधिक वापरामुळे नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे, तसेच हेच तंत्रत्रान वापरून गुन्हे करण्याचे प्रमाण व प्रकारही वाढले आहेत. त्याचा सामना करण्यासाठी सायबर पोलिसांची एक फौजच उभी करावी लागणार आहे. अन्यथा बाल्टिमोरप्रमाणे कुठल्याही शहराची कुंडली हॅकरच्या हाती सापडू शकते.

Leave a Comment