सायबेरियाच्या बर्फाळ डोंगरात सापडले हिम युगातील एका लांडग्याचे मुंडके


मॉस्को- सायबेरियाच्या बर्फाळ डोंगरात हिम युगातील एका लांडग्याचे मुंडके शास्त्रज्ञांनी शोधले आहे. या लांडग्याच्या मेंदुसहित त्याचे केस आणि दातही सुरक्षित असून याबाबत शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार अंदाजे 40 हजार वर्षे जुने हे मुंडके आहे. 16 इंच एवढी त्याच्या मुंडक्याची लांबी असून जे आजच्या लांडग्यांच्या मुंडक्यापेक्षा(9.1-11 इंच) दुप्पट मोठे आहे.

2018साली पावेल एफिमोव या शास्त्रज्ञांनी या लांडग्याचे मुंडके आर्कटिक सर्कलमध्ये शोधले आहे. आसपास कुठेच त्या लांडग्याचे धड मिळाले नाही. 32 हजार वर्षांपूर्वी मानव रशियात आला होता, तर 40 हजार वर्षे जुने लांडग्याचे मुंडके असल्यामुळे या लांडग्याची शिकार एखाद्या जनावराने केली असल्याची शक्यता आहे.

(व्हिडीओ सौजन्य – No Comment TV)
याबाबत रशियातील शास्त्रज्ञ डॉक्टर एल्बर्ट प्रोतोपोपोव यांनी सांगितले की, मुंडक्यात असलेल्या पेश्या अजूनही नवीन असल्यासारख्याच आहेत. आजच्या काळातील लांडग्यांसोबत त्याच्या मुंडक्याची तुलना करून संशोधन केले जाईल. यामुळे मागील हजारो वर्षांपासून जनावरांचा विकास कसा झाला ते स्पष्ट होईल.

रशियातील संकेतस्थळ सायबेरिअन टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, त्याच्या डिएनएवरही शास्त्रज्ञ संशोधन करतील, जेणेकरून त्या काळातील परिस्थितीची माहिती मिळवण्यास मदत होईल. जिकेई यूनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन इन टोक्योच्या प्रोफेसर नओकी सुजुकी यांनी सांगित्यानुसार, लांडग्याच्या मुंडक्याच्या सीटी स्कॅनमध्ये त्याचा मेंदू चांगल्या स्थितीत असल्याचे समोर आले आहे.

Leave a Comment