इंग्लंडमधील टीम इंडियाच्या ड्रेसिंगरूममध्ये रिषभ पंतला प्रवेश बंदी!


लंडन : मागच्या महिन्याच्या 30 मे पासून क्रिकेटचा महाकुंभ अर्थात विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली असून टीम इंडियाने या स्पर्धेतील आपले दोन्ही सामने जिंकून आपल्या मिशनला सुरुवात केली आहे. यात भारताचा सलामीवीर शिखर धवनच्या अंगठ्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली. तो नक्की किती सामने खेळू शकणार नाही हे अद्याप समजले नसले तरी त्याला किमान दोन आठवडे खेळता येणार नाही. आता रिषभ पंतला इंग्लंडमध्ये त्याच्या जागी राखीव खेळाडू म्हणून बोलावण्यात आले आहे.

रिषभ पंतला भारताच्या विश्वचषक संघात स्थान मिळू शकले नव्हते. निवड समितीने संघात दुसरा यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिकला जागा दिली. त्याचा अनुभव महत्त्वाच्या सामन्यात धोनीला दुखापत झाली तर कामी येऊ शकतो असे निवड समितीने म्हटले होते. आता शिखर धवन तंदुरुस्त झाला नाही तर त्याला पर्याय म्हणून पंत संघात असेल.

जरी इंग्लंडला रिषभ पंत पोहोचला असला तरी भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये त्याला प्रवेश मिळणार नाही. तोसुद्धा खलील अहमद प्रमाणेच दुसऱ्या वाहनाने प्रवास करेल. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांनी याची माहिती एका वृत्त संस्थेला दिली आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, रिषभ पंत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी इंग्लंडला पोहोचेल. शिखर धवन अद्याप संघात असल्याने पंत संघात नसल्यामुळे खलील अहमदसोबत त्याला प्रवास करावा लागेल.

पंतला सामन्याच्या दिवशी ड्रेसिंग रुममध्ये जाता येणार नाही. आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी नियमांनुसार फक्त संघात निवड झालेल्या खेळाडूंनाच संघासोबत प्रवास करता येतो आणि ड्रेसिंग रुममध्ये जाता येते असे अधिकाऱ्यांनी सांगितले. रिषभ पंतला आयसीसीच्या नियमानुसार भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये जाता येणार नाही. गेल्या विश्वचषकमध्ये भुवनेश्वर कुमारला कव्हर म्हणून धवल कुलकर्णीला ऑस्ट्रेलियात पाठवण्यात आले होते. पण त्यालाही ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश नव्हता.

Leave a Comment