शिखर धवनच्या कमबॅकवर कोहलीचे मोठे वक्तव्य


ट्रेंट ब्रिज : विश्वचषक स्पर्धेत कमबॅक करण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाल्यामुळे क्रिकेटपासून तीन आठवडे दूरावलेला शिखर धवन सज्ज होत आहे. भारताच्या सलामीवीराच्या अंगठ्याला पॅट कमिन्सने टाकलेल्या चेंडूवर दुखापत झाली होती. त्याने तरीही जिद्दीने खेळ करत शतक झळकवले होते. पण, दुखापतीमुळे क्षेत्ररक्षणाला तो आला नव्हता. दुखापतीतून तो सावरत असून तो 10-12 दिवसांत कमबॅक करेल असा विश्वास आहे.

तो नॉटिंगहॅम येथील ट्रेंट ब्रिज मैदानावर संघांसोबत सराव सत्रातही दिसला होता. पावसामुळे भारत-न्यूझीलंड हा सामना रद्द करण्यात आला आणि दोन्ही संघांना समान एक गुण देण्यात आले. कर्णधार विराट कोहलीने या सामन्यानंतर धवनच्या दुखापतीबाबत महत्त्वाची अपडेट दिली. त्याच्या अंगठ्याला सध्या प्लास्टर करण्यात आले असून ते पुढीत काही दिवस तसेच ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच्या दुखापतीची चिकिस्ता करण्यात येईल. आशा करतो की तो साखळी फेरीच्या मध्यंतराच्या सत्रात पुनरागमन करेल आणि उपांत्य फेरीचा सामनाही खेळेल.

यासंदर्भात ईएसपीएनक्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार धवन साखळी फेरीच्या अखेरच्या टप्प्यात पुनरागमन करेल. तो यजमान इंग्लंडविरुद्ध 30 जूनला एडबॅस्टन येथे होणाऱ्या लढतीत त्यामुळे खेळण्याची शक्यता आहे. भारतीय संघ त्यानंतर बांगलादेश ( 2 जुलै) आणि श्रीलंका ( 6 जुलै) या संघांचा सामना करेल. पण, धवनला पाकिस्तान ( 16 जून), अफगाणिस्तान ( 22 जून) आणि वेस्ट इंडिज ( 27 जून) या लढतींना मुकावे लागणार आहे. धवनला स्टॅण्ड बाय खेळाडू म्हणून रिषभ पंतला इंग्लंडला बोलावण्यात आले आहे.

Leave a Comment