पर्यटक? नको रे बाबा – युरोपीय शहरांचा नवा पवित्रा!


आधुनिक काळात दळणवळणाच्या सोईसुविधा वाढल्या, वाहतुकीची साधने वाढली त्यामुळे एका क्षेत्राला अलीकडच्या काळात चांगलेच प्रोत्साहन मिळाले. ते म्हणजे पर्यटन. मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की तिचा विचका व्हायला सुरूवात होते. यातूनच अतिपर्यटनामुळे होणाऱ्या त्रासाची व ऱ्हासाची जाणीव लोकांना व्हायला लागली आहे. आपल्याकडे याबद्दल फारशी पावले कोणी उचलली नाहीत तरी युरोपमध्ये त्याची सुरूवात झाली आहे.

म्हणूनच युरोपमधील अनेक शहरांमध्ये अशा पाहुण्यांना रोखण्यासाठी पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. ब्रुगेज या छोट्या शहराची त्या यादीत भर पडली असून पर्यटकांच्या संख्येवर मर्यादा घालू पाहणारे हे आणखी एक शहर ठरले आहे.

युरोपियन ग्रँड टूरच्या सहलींमध्ये ब्रुगेज हे बेल्जियमध्ये असलेले शहर म्हणजे लोकप्रिय ठिकाण आहे . या शहरात असलेल्या ऐतिहासिक सिटी सेंटर या भागाचा 2000 मध्ये यूनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला होता. “मध्ययुगीन ऐतिहासिक वस्तीचे सर्वोत्कृष्ट उदाहरण” म्हणून त्याचा निर्देश केला जातो. परंतु लोकप्रियता ही काही तशी स्वस्त बाब नाही, त्यासाठी बऱ्याचदा मोठी किंमत अदा करावी लागते. विशेषत: ब्रुगेजसारख्या छोट्याशा शहराला तर जास्तच.

म्हणूनच या शहरात येऊ पाहणाऱ्या पर्यटकांवर बंधने घालण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत. ब्रुगेज महापौर म्हणून 2018 मध्ये निवडून आलेल्या डर्क डी फॉव यांनी या प्रयत्नांना बळ दिले आहे. “येथे अगदीच डिस्नेलँड बनू नये असे वाटत असल्यास आम्हाला पर्यटकांचे लोंढे थांबविणे भाग आहे,” असे डी फॉव यांनी सांगितले .

ब्रुगेजमध्ये आता ‘शहर दर्शना’च्या फेऱ्यांच्या यापुढे जाहिराती करण्यात येणार नाहीत किंवा प्रचार करण्यात येणार नाही. तसेच झीब्रूगे बंदरात नांगर टाकणाऱ्या क्रूझ जहाजांची संख्या कमी करण्यासाठीही उपाय योजले जातील, असे हेट निउव्स्ब्लॅड या स्थानिक वृत्तपत्राने म्हटले आहे..

सध्या या बंदरात एका वेळेस पाच क्रूझ जहाजे थांबण्याची सोय आहे, परंतु आता ही संख्या प्रत्येक दिवशी दोन इतकी मर्यादित करण्यात येणार आहे. शिवाय सप्ताहांताच्या दिवशी नांगर टाकण्याऐवजी क्रूझ कंपन्यांना कामाच्या दिवशी या बंदरात मुक्कामाला येण्यास सांगण्यात येईल. त्यामुळे गर्दी पांगेल, अशी अधिकाऱ्यांना अपेक्षा आहे.

एका दिवसात शहर दर्शनासाठी पर्यटकांची संख्या कमी व्हावी, यासाठी पर्यटन मंडळ ब्रुसेल्स आणि पॅरिस यांसारख्या इतर जवळपासच्या शहरांमध्ये देखील जाहिरात मोहिमा राबविणे बंद करणार आहे. कारण केवळ एका दिवसासाठी शहराला भेट देणाऱ्या पर्यटकांमुळे अत्यंत मोलाचा हॉटेलचा महसूल बुडतो. सध्या ब्रुगेजमध्ये पर्यटकांची इतकी गर्दी झाली आहे, की सिटी सेंटरच्या मूळ रहिवाशांपेक्षा ते तिपटीने जास्त आहेत.

ब्रुगेज शहराच्या या निर्णयामुळे युरोपमध्ये वाढणाऱ्या पर्यटकांच्या लोंढ्याची समस्या पुन्हा ऐरणीवर आली आहे. युरोपमधील बहुतेक शहरे पर्यटकांच्या गर्दीशी सामना करत आहेत. ब्रुगेज येथून 270 किमी दूर असलेल्या नेदरलँडच्या अॅमस्टरडॅमलाही याचे समस्येने घेरले आहे. शहरात पर्यटकांची संख्या वाढल्याने गर्दी होते आहे, घरांचे दर वाढले आहेत, सार्वजनिक सुविधांवर ताण येत आहे आणि त्यामुळे नागरिकांवर प्रतिकूल परिणाम होत असून त्यांच्यातील सौहार्द कमी होत चालले आहे, असे पर्यटन मंत्रालयाने म्हटले आहे.

त्यामुळे स्थानिक पर्यटन प्राधिकरणाने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला. शहरातील प्रसिद्ध असे “आय अॅमस्टरडॅम” हे चिन्ह शहराच्या मध्यभागातून अन्यत्र स्थानांतरित करण्याचा तो निर्णय. इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अलीकडे हे चिन्ह लोकप्रिय झाले होते. नेदरलँडमध्ये येणाऱ्या पर्यटकांनी केवल अॅमस्टरडॅमपुरते मर्यादित न राहत देशाच्या इतर भागांनाही भेट द्यावी, यासाठी व्यापक आणि केंद्रीय योजनेचा भाग म्हणून हे पाऊल उचलण्यात आले.

त्याच प्रमाणे रोम शहरातील अधिकाऱ्यांनीही पर्यटकांच्या घाण, गर्दी आणि नुकसान होऊ शकणाऱ्या कृतींना आळा घालण्याच्या दिशेने निर्णय घेतले आहेत. यात शहरातील प्रसिद्ध कारंज्यांमध्ये पोहण्यास मनाई करण्याचाही समावेश आहे.

आपल्याकडे सुद्धा हळूहळू का होईना पण या संदर्भात जागरुकता निर्माण होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. म्हणूनच अतिपर्यटन आणि त्याचा पर्यावरणाला होणारा धोका टाळण्यासाठी यंदा राधानगरी अभियारण्यात होणाऱ्या काजवा महोत्सवासाठी पर्यटकांना मर्यादित प्रवेश देण्याचे ठरविण्यात आले होते.

Leave a Comment