डॉक्टरांचा संप – ममता बॅनर्जी आगीतून फुफाट्यात!


लोकसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगाल आधीच राजकीय वादाने पेटलेले आहे. त्यातच तेथील डॉक्टरांनीही राज्य सरकारच्या विरोधात संपाचे हत्यार उपसले आहे. या वादाने केवळ राजकीय स्वरूपच धारण केलेले नाही, तर दिल्ली, हैद्राबाद आणि मुंबईसारख्या देशभरातील डॉक्टरांनीही आपल्या बंगाली समव्यावसायिकांना पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे.

पश्चिम बंगालच्या संपकरी डॉक्टरांना धमकी दिल्याबद्दल विरोधी पक्षांनी ममतांना धारेवर धरले आहे. डॉक्टरांचे हे आंदोलन भारतीय जनता पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कट आहे, असा आरोप ममतांनी केला आहे. तसेच राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली आहे. आता आरोग्य खाते ममता यांच्याकडेच आहे, ही यात उल्लेखनीय बाब होय. या समस्येवर उपाय शोधण्याऐवजी ममता बॅनर्जी यांनी दुसऱ्यांवर दोषारोप करण्याचा मार्ग पत्करला आहे, अशी टीका बंगाल भाजपचे उपप्रमुख जयप्रकाश मझुमदारे यांनी म्हटले आहे. दुसरीकडे ममता बॅनर्जी या आंदोलनाला राजकीय रंग देत आहेत, असा आरोप माकपने केला आहे.

डॉक्टरांच्या या आंदोलनाची ठिणगी सोमवारी रात्री पडली. कोलकाता येथील एनआरएस मेडिकल कॉलेज या सरकारी इस्पितळात रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे तेथील दोन डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. ही मारहाण करण्यासाठी ट्रकमध्ये भरून 200 लोक आले होते. ही मारहाण एवढी भीषण होती, की यातील एका डॉक्टरच्या कवटीला तडे गेल्याचे एक्स-रे तपासणीत समोर आले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले. राज्यातील अनेक ठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे. एनआरएस मेडिकल कॉलेज आणि इस्पितळाचे अधिष्ठाता साइबल मुखर्जी आणि वैद्यकीय अधीक्षक प्रो. सौरभ चटोपाध्याय यांनी या समस्येतून मार्ग काढता न आल्यामुळे राजीनामा दिला आहे.

गुरुवारी ममतांनी एसएसकेएम या सरकारी इस्पितळाला भेट दिली आणि संपकरी डॉक्टरांना कामावर रूजू होण्याचा आदेश दिला. रुग्णांना वगळता अन्य कोणत्याही व्यक्तीला इस्पितळात जाऊ देऊ नये, असेही त्यांनी पोलिसांना फर्मावले. यावेळी डॉक्टरांनी ’वी वाँट जस्टिस’च्या घोषणा ममतांसमोरच दिल्या.

ही भेट देताना ममतांनी डॉक्टरांचे म्हणणे सहानुभूतीने ऐकण्याऐवजी त्यांनाच फैलावर घेतले. गुरुवारी दोन वाजेपर्यंत कामावर तत्काळ रूजू व्हा, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आणखीच संतप्त झालेल्या डॉक्टरांनी थेट राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेतली. तसेच ममतांनी दिलेला अल्टिमेट धुडकावत आपला संप चालू ठेवण्याचे जाहीर केले.

आता पश्चिम बंगालमध्ये एवढे रामायण घडल्यानंतर त्याचे पडसाद देशात इतरत्र उमटले नसते तरच नवल. या डॉक्टरांच्या समर्थनार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) अखिल भारतीय विरोध दिवस पाळण्याचे जाहीर केले आहे. दिल्ली मेडिकल असोसिएशनसोबतच पाटणा आणि रायपुर येथील एम्स संस्थांतील डॉक्टरांनीही या संपाला पाठिंबा दिला आहे. पुण्यातील बीजे वैद्यकिय महाविद्यालय आणि रुग्णालयातील मार्डच्या डॉक्टरांनीही त्यांच्या संपाला पाठिंबा म्हणून संपाची हाक दिली आहे. शुक्रवारी दिवसभर हा संप चालेल.

खरे म्हणजे राजकीय पराभवाचा सामना कराव्या लागलेल्या ममता बॅनर्जी यांना परिस्थितीतून कसा मार्ग काढावा, हेच समजेनासे झाले आहे. आपल्या समोरच्या समस्येसाठी भाजप आणि माकप या पक्षांवर खापर फोडून त्यांनी परिस्थिती आणखी चिघळण्यास हातभारच लावला. या पक्षांची या संपात भूमिका नाहीच, असे कोणी म्हणू शकत नाही. परंतु काही गोष्टी दिसत असल्या तरी बोलायच्या नसतात. त्यांच्यातून मुत्सद्देगिरीतूनच वाट काढावी लागते. मात्र ममतांनी आपल्या नेहमीच्या पद्धतीने हडेलहप्पी करून डॉक्टरांना आदेश दिला आणि त्याचा परिणाम उलटाच झाला. आक्रमक राजकारणी म्हणून ममता बॅनर्जी यांची देशाच्या राजकारणात ओळख आहे. मात्र ही आक्रमकता गेल्या काही काळात आक्रस्ताळेपणात बदलली आहे. त्यांच्या या आक्रस्ताळेपणाचा फायदा घेऊनच भाजपने हळूहळू पश्चिम बंगालमध्ये आपले बस्तान बसविले. आता प्रशासक म्हणूनही त्या असाच आक्रस्ताळेपणा करत असतील तर संपूर्ण राज्य त्यांच्या हातातून निसटण्यास वेळ लागणार नाही.

Leave a Comment