भारत-पाकिस्तान जाहिरातीमुळे सानियाचा तिळपापड


नवी दिल्ली : क्रिकेट विश्वचषकाचा उत्साह सध्या देशासह संपूर्ण जगात पाहायला मिळतो आहे. भारतीयांसाठी सर्वात रोमांचक असा कुठला सामना असेल, तर तो म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान सामना. भारत-पाकिस्तान सामन्याची क्रिकेट चाहत्यांना विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापेक्षा जास्त उत्सुकता असते. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना येत्या 16 जूनला रंगणार आहे. सोशल मीडियावर त्यापूर्वी मोठ्या प्रमाणात एक जाहिरात केली जात आहे. त्याचबरोबर या सामन्याच्या प्रमोशनसाठी अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण भारताची स्टार टेनिस खेळाडू आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकची पत्नी सानिया मिर्झा या जाहिरातींवर चांगलीच भडकली आहे. अशा प्रकारच्या जाहिराती न पसरवण्याचा सल्ला तिने क्रिकेटप्रेमींना दिला.

रविवारी मँचेस्टर येथे येत्या 16 जूनला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी नेहमीप्रमाणे यंदाही हा सामना महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे आता क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रमोशनल व्हिडीओचा सामन्याच्या एका आठवड्यापूर्वी सोशल मीडियावर पाऊस पडतो आहे. त्याचबरोबर दोन्ही देशांमध्ये या सामन्यापूर्वी कमालीचा उस्ताह आहे, हे या जाहिरातींवरुन दिसून येत आहे.

आपल्या संघाच्या समर्थनात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी जाहिरात बनवली आहे. पण हे जाहिरातवॉर सानिया मिर्झाच्या काही पचनी न पडल्यामुळे या जाहिरातींवर तिने आक्षेप व्यक्त केला आहे.


फालतू जाहिराती सीमेच्या दोन्ही बाजूने सुरु आहेत. हे खूप वाईट आहे. मी तुम्हा सर्वांना विनंती करते, कृपया हा एक क्रिकेट सामनाच राहू द्या. या प्रकारच्या अनावश्यक गोष्टीचा प्रचार करण्याची तुम्हाला काहीही गरज नाही. हे फक्त क्रिकेट आहे, असे ट्विट करत सानियाने अशा प्रकारच्या जाहिरातींचा प्रचार न करण्याचा सल्ला क्रिकेटप्रेमींना दिला आहे.

Leave a Comment