आता श्वानांसाठीही ‘एअर बीएनबी’ !


आजकाल सुट्टीसाठी देशामध्ये किंवा विदेशामध्ये जाताना राहण्यासाठी हॉटेल्स आरक्षित करण्याच्या ऐवजी ‘एअर बीएनबी’च्या पर्यायाला अलीकडच्या काळामध्ये जास्त पसंती मिळू लागली आहे. हॉटेलच्या लहानशा रूममध्ये वास्तव्य करण्याच्या ऐवजी एअर बीएनबीच्या माध्यमातून उपलब्ध असलेले आणि आपल्याला आवडणारे व आपल्याला हव्या त्या सर्व सोयी उपलब्ध असणारे निवासस्थान आरक्षित करून अगदी घरच्याप्रमाणे तिथे राहण्याचा पर्याय पर्यटकांना जास्त पसंत पडत आहे. एअर बीएनबीचा पर्याय हॉटेलमध्ये राहण्याच्या खर्चापेक्षा थोडासा महाग असला, तरी एअर बीएनबी मध्ये मिळणाऱ्या सोयींसाठी थोडे जास्त पैसे मोजण्याची पर्यटकांची आनंदाने तयारी असलेली पहावयास मिळत आहे. त्यामुळे एअर बीएनबी हा पर्याय केवळ परदेशामधेच नाही, तर भारतामध्येही खूप लोकप्रिय होऊ लागला आहे.

पर्यटकांसाठी एअर बीएनबीची संकल्पना आता चांगलीच रूढ झाली असी, तरी प्राण्यांसाठी एअर बीएनबीची कल्पना मात्र अद्याप आपल्याला नवी आहे. अलीकडच्या काळामध्ये स्कॉटलंड येथील स्कॉटलंडवेल येथे राहणाऱ्या एका महिलेने आता श्वानांसाठी एअर बीएनबीची सुविधा उपलब्ध करविली आहे. एलेन वॉरबर्टन या महिलेने आता श्वानांसाठी एअर बीएनबी सुरु केले असून, सतत श्वानांच्या संगतीत राहिल्याने आपल्या मनावरील तणाव कमी होण्यास पुष्कळ मदत झाली असल्याचे एलेन म्हणते. एलेन स्कॉटलंडच्या पोलीसखात्यातून अलीकडेच निवृत्त झाली असून, तिने तिचा जोडीदार जॉनसोबत ‘बार्किंग मॅड’ नामक खास श्वानांसाठी एअर बीएनबी सुरु केले आहे. या एअर बीएनबी द्वारे सुट्टीसाठी आपल्या श्वानांना आपल्या सोबत नेऊ न शकणाऱ्या श्वानप्रेमींच्या श्वानांसाठी, त्यांच्या गरजेप्रमाणे, इतर श्वानप्रेमींच्या घरी तात्पुरते राहण्याची सोय केली जात असते. त्यामुळे केनेल्स किंवा डॉग हॉस्टेल्समध्ये श्वानांना ठेवण्याच्या ऐवजी, त्यांच्या पसंतीच्या नव्या परिवाराच्या सोबत राहण्याची सोय या श्वानांना उपलब्ध करून देण्यात येते.

या सुविधेचा फायदा श्वानाच्या मालकांना, श्वानांना आणि त्यांना आपल्या घरी ठेऊन घेणाऱ्या श्वानप्रेमींनाही होत असतो. श्वानाचे मालक सुट्टीवर जाताना निर्धास्त मनाने जाऊ शकतात, श्वानाच्या गरजेनुसार सर्व सोयी त्यांना तात्पुरत्या घरामध्ये मिळत असल्याने श्वानही समाधानी आणि ज्यांच्या घरामध्ये श्वानांनी राहायचे ती मंडळी देखील श्वानप्रेमी असल्याने सर्वांनाच या उपक्रमाचा लाभ मिळत असल्याचे एलेन म्हणते. एलेनला गेली काही वर्षे डिप्रेशन सतावित असून, श्वानांसाठी एअर बीएनबीची सुविधा तिने उपलब्ध करवून दिल्यापासून आपल्या मनस्थितीमध्ये खूपच सकारात्मक बदल झाला असल्याचे एलेनचे म्हणणे आहे. श्वानांच्या संगतीमध्ये आपण कायम सक्रीय राहत असून, त्यामुळे आपल्या मनामध्ये घर करून बसलेल्या नैराश्याच्या भावनेवर नियंत्रण मिळविणे आपल्याला शक्य झाले असल्याचे एलेन म्हणते.

Leave a Comment