लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसच्या गिफ्ट शॉपमध्ये खरेदी करण्यासाठी अशाही वस्तू !


ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांचे लंडन येथील औपाचारिक निवासस्थान असलेल्या बकिंगहॅम पॅलेसचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक लंडनमध्ये येत असतात. बकिंगहॅम पॅलेस केवळ राणीचे औपचारिक निवासस्थान म्हणूनच प्रसिद्ध नाही, तर ही वस्तू ब्रिटनमधील अनेक ऐतिहासिक आणि राजनैतिक घटनांची साक्ष देत आजही डौलाने उभी आहे. या वास्तूपासून जवळच आहे, बकिंगहॅम पॅलेसचे गिफ्ट शॉप. मात्र हे गिफ्ट शॉप सर्वसामान्य गिफ्ट शॉप्सच्या मानाने जरा हटके आहे. सर्वसाधारणपणे एखाद्या प्रसिद्ध पर्यटनस्थळी असलेल्या गिफ्ट शॉप्समध्ये असलेल्या टी-शर्ट्स, किंवा फ्रीज मॅग्नेट्स किंवा चॉकोलेट्सचा खजिना बकिंगहॅम पॅलेसच्या गिफ्ट शॉपमध्ये पहावयास मिळत नाही, तर शाही परिवारातील सदस्यांशी निगडीत वस्तू या दुकानामध्ये पहावयास मिळतात. हे गिफ्ट शॉप ‘रॉयल कलेक्शन ट्रस्ट’च्या वतीने चालविले जात असून, यामध्ये राणी एलिझाबेथ वापरीत असलेले हँड क्रीम, बकिंगहॅम पॅलेसचे चिन्ह असलेल्या शॉवर कॅप्स आणि राणी एलिझाबेथच्या आवडत्या ‘कॉर्गी’ या प्रजातीच्या कुत्र्यांच्या ‘सॉफ्ट टॉय’ रूपातील प्रतिकृती या खरेदीसाठी उपलब्ध आहेत.

या दुकानामध्ये प्रवेश करताच कानी पडते ते ब्रिटनचे राष्ट्रगीत. दुकानातील मुख्य दर्शनी भिंतीवर राणी एलिझाबेथचे भव्य छायाचित्र पर्यटकांना पहावयास मिळते. राणीच्या आवडत्या कॉर्गींची देखील अनेक छायाचित्रे या दुकानामध्ये पहावयास मिळतात. किंबहुना या कॉर्गींच्या प्रतिकृती असलेली सॉफ्ट टॉइज, ही या गिफ्टशॉपमधील सर्वाधिक विकली जाणारी वस्तू असल्याचे या दुकानातील कर्मचारी सांगतात. याशिवाय बकिंगहॅम पॅलेसची औपचारिक चिन्हे असलेल्या शॉवर कॅप्स, स्वयंपाकामध्ये वापरण्याचे लाकडी चमचे, एप्रन्स, ओव्हनमधील गरम अन्नपदार्थ बाहेर काढण्यासाठी वापरले जाणारे ग्लोव्हज, चहा पिण्यासाठी नाजूक नक्षीकाम असलेल्या कपबश्या, शॉट ग्लासेस, आणि खास राणी एलिझाबेथची आवडती चॉकोलेट्सही या दुकानामध्ये उपलब्ध आहेत.

शाही परिवारजनांच्या सकाळच्या नाश्यारासाठी दररोज वापरले जाणारे जॅम्स, औपचारिक चिन्हे असलेले नॅपकिन्स, राणीचे आवडते ‘शिया बटर अँड बीजवॅक्स’ हॅन्ड क्रीम, इतकेच नाही, तर राणीच्या औपचारिक मुकुटाच्या प्रतिकृती देखील या दुकानामध्ये उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे ‘क्रिसमस ट्री’वर लावण्यासाठी शोभेच्या वस्तू, आणि इतरही अनेक सुंदर वस्तू या दुकानामधे खरेदीसाठी उपलब्ध आहेत.

Leave a Comment